मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जून २०२४
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लग्न करुन तिच्यावर लैगिंक अत्याचारासह तिला गर्भपात प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या माहेरसह सासरच्या दोन्ही कुटुंबातील सहाजणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसंनी लैगिंक अत्याचारासह बालविवाह प्रतिबंध, पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या आरोपीमध्ये पिडीत मुलीच्या पतीसह सासू, तिचा सख्खा भाऊ, वहिणी, वहिणीची आत्या आणि लग्न लावणार्या मौलानाचा समावेश आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशीनंतर संंबंधितांवर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.
सतरा वर्ष आठ महिने वयाची पिडीत मुलगी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहते. डिसेंबर २०२२ रोजी ती अल्पवयीन असल्याची माहिती असताना तिच्या भावासह वहिणी, वहिणीची आत्या यांनी तिचे २५ वर्षांच्या एका तरुणासोबत बालविवाह लावला होता. लग्नानंतर तिला नाशिक येथील मालेगावात नेण्यात आले होते. तिथेच तिच्या पतीने तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध जबदस्तीने अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. या संबंधातून तिने एका बाळाला जन्म दिला होता. मात्र त्यांनी तो बाळ त्यांचा नाही असे सांगून तिचा मानसिक व शारीरिक शोषण केले होते. अनेकदा तिचा पती आणि सासू तिला क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण करत होती. सतत होणार्या भांडणानंतर तिला तिच्या गोवंडी येथील राहत्या घरी पाठविण्यात आले होते. घरी आल्यानंतर तिला ती पुन्हा गर्भवती असल्याचे समजले होते. त्यामुळे तिने तिच्या पतीसह सासूला ही माहिती सांगितली होती. यावेळी त्यांनी तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केले होते. या प्रकारानंतर ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून तिला नैराश्य आले होते. त्यामुळे तिने संबंधित सर्व आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
घडलेला प्रकार तिने शिवाजीनगर पोलिसांना सांगून तिच्या पतीसह सासू, तिचा भाऊ, वहिणी, वहिणीची आत्या आणि त्यांचा बालविवाह लावणार्या मौलाना अशा सहाजणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या सहाजणाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी ३७६, ३७६ (२), (एन), ३२३, ५०४, ३४ भादवी सहकलम ९, १० बालविवाह प्रतिबंधक अधिनियम सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच संबंधित सहाजणांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.