मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जून २०२४
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरातील एका महिला मंडळाच्या सभासदांना स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून दोन बंधूंनी फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये घेऊन या दोन्ही बंधूंनी साठ महिलांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अविनाश देवराम भानजी आणि प्रमोद देवराम भानजी यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीसह बोगस दस्तावेज बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
साधना शिवाजी भंडारे हे महिला मालाडच्या मढ, दुर्गामाता रहिवाशी संघात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरात स्थानिक महिलांचे एक खाजगी मंडळ असून या मंडळाकडून परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आठ वर्षांपूर्वी त्यांची भानजी बंधूंशी ओळख झाली होती. या दोघांनी मंडळातील सर्व महिलांसाठी स्वस्तात घराची एक योजना आणली होती. मालाड येथील मढ, शिवाजीनगर, गेट क्रमांक तीनमध्ये एक जागा असून या जागेत मंडळाच्या सर्व महिलांना स्वस्तात घराचे स्वप्न दाखविण्यात आले होते. स्वस्तात घर मिळत असल्याने साठहून अधिक महिलांनी त्यांच्या योजनेत घरासाठी अर्ज केला होता. यावेळी त्यांच्यासोबत भानजी बंधूंनी एक करार केला होता. या करारानंतर प्रत्येक महिलांकडून चार लाख रुपये घेण्यात आले होते.
अशा प्रकारे त्यांनी ६० महिलांकडून २ कोटी ४० लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना रुम बांधून दिले नाही. तसेच त्यांच्याकडून रुमसाठी घेतलेली रक्कमही परत केली नाही. या दोघांनी नियोजनपूर्वक बोगस दस्तावेज बनवून घरासाठी २ कोटी ४० लाख रुपये घेऊन या महिलांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच या मंडळाच्या महिलांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अविनाश भानजी आणि प्रमोद भानजी या दोघांविरुद्ध पोलिसंनी ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून दोषी आरोपी बंधूंवर कारवाई करण्याचे आदोश मालवणी पोलिसांना देण्यात आले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.