लिव्ह पार्टनर प्रेयसीची प्रियकराकडून चाकूने भोसकून हत्या

नागपाडा येथील घटना; हत्येच्या गुन्ह्यांत प्रियकराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जून २०२४
मुंबई, – गेल्या एक वर्षांपासून लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या आरती विजय सिंग ऊर्फ सरस्वती सानप या ३७ वर्षांच्या महिलेची तिच्याच प्रियकराने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना नागपाडा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकर सिराजउद्दीन जमालउद्दीन शेख ऊर्फ चॉंद (४१) याला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना बुधवारी १२ जूनला सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास नागपाडा येथील ऋषी मेहता चौकाजवळील दलित मित्र स्व. जयसिंभाई पी. सोलंकी उद्यानाला लागून असलेल्या फुटपाथवर घडली. रिहाना अशफाक सय्यद ही महिला विरार येथील जिवदानी पाडा परिसरात राहत असून घरकाम करते. आरती सिंग ही तिची सख्खी बहिण असून तिचे सिराजउद्दीनसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या एक वर्षांपासून ते दोघेही नागपाडा येथे लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. परिसरात त्यांनी ते दोघेही पती-पत्नी असल्याचे सांगितले होते. १२ जूनला सायंकाळी सहा वाजता या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात सिराजउद्दीनने तिला बेदम मारहाण केली होती. त्यात आरतीच्या पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, त्यामुळे रिहानाची पोलिसांनी चौकशी करुन तिच्या तक्रारीवरुन सिराजउद्दीनविरुद्ध शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरतीवर उपचार सुरु असताना तिचा गुरुवारी २० जूनला रात्री दहा वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात आरतीवर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे नमूद करण्यात आले होते. भांडणातून सिराजउद्दीनने तिच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते, मात्र ती धक्काबुक्कीत पडून तिच्या पायाला खिळा लागल्याचे सांगून त्याने पोलिसांची दिशाभूल केली होती.

तपासात हा प्रकार उघडकीस येताच सिराजउद्दीनविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात आरतीचे पूर्वीचे नाव सरस्वती सानप असून तिने एका मुस्लिम तरुणासोबत लग्न केले होते. तिच्या पहिल्या पतीचे नाव संजय खडसे असून असून त्याच्यासोबत ती काही वर्ष अमरावती येथे राहत होती. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली. मात्र संजयसोबत पटत नसल्याने ती त्याला सोडून मुंबईत आली होती. नंतर तिची ओळख विजय सिंगसोबत झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध झाले आणि तिने त्याच्याशी लग्न केले होते. या दोघांना चार मुले झाली होती. मात्र तिचे विजयसोबत खटके उडू लागले होते. त्यामुळे तिने त्यालाही सोडून दिले होते. त्यानंतर ती भरत मकवाना नावाच्या एका व्यक्तीसोबत राहू लागली. त्याच्यापासून तिला एक मुलगी झाली. त्यानंतर तिचे सिराजउद्दीनसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या एक वर्षांपासून ती सिराजउद्दीनसोबत राहत होती. त्यांच्यात झालेल्या भांडणानंतर त्याने तिच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याच गुन्ह्यांत सिराजउद्दीन हा पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गुन्ह्यांतील हत्यार लवकरच त्याच्याकडून हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सागितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page