दिडशे कोटीच्या कर्जाच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक
दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जून २०२४
मुंबई, – दिडशे कोटीचे कर्ज देतो असे सांगून पवईतील एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाची सुमारे दोन कोटीची फसवणुक कटातील एका मुख्य वॉण्टेड आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. राजशेखर सुबय्या ऊर्फ एस. के तेवर ऊर्फ राजन असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पवई पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध अंधेरीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात ए सेतुराज ऊर्फ सेतूराज असीअवदम, एम. थॉमस ऊर्फ थॉमस मदुरा आणि शनमुगसुंदरम ए ऊर्फ शनमुगसुंदरम अनडीअयपन यांचा समावेश होता. या आरोपपत्रात राजशेखर सुबय्या ऊर्फ राजन याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
राकेश देवेंद्रकुमार दुगर हे पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात राहत असून ते इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक आहेत. त्यांची एक खाजगी कंपनीत असून ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तूचा व्यवसाय करते. कंपनीचे कार्यालय घाटकोपरच्या एलबीएस रोड, भावेश्वर आर्केटमध्ये आहे. गेल्या वीस वर्षांपासून राकेश दुगर हे या व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करायचा होता, त्यासाठी त्यांना शंभर ते दिडशे कोटीच्या आर्थिक कर्जाची गरज होती. त्यांच्यावर आधी काही बँकांचे कर्ज होते, ते कर्ज फेडून उर्वरित रक्कम व्यवसायात गुंतविण्याचा त्यांचा विचार होता. याच दरम्यान त्यांच्या मित्रांनी त्यांची नवी मुंबईतील सुरेश नायडू याच्याशी ओळख करुन दिली होती. त्याने सुंदर नावाचा एक व्यक्ती सुब्रमण्यम याच्या मदतीने त्यांना कर्ज मिळवून देईल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूचा रहिवाशी असलेल्या सुब्रमण्यमशी फोनवरुन चर्चा केली होती. त्याने त्यांच्या कंपनीची बॅलेन्सशीटची मागणी करुन त्याच्या परिचित थॉमस आणि राजन हे त्यांना कर्ज देतील असे आश्वासन दिले होते. याच दरम्यान ते सुब्रमण्यमशी सतत संपर्कात होते. एप्रिल २०२१ रोजी ते त्यांच्या मित्रांसोबत तामिळनाडू येथे गेले होते. तिथे त्यांची ओळख सुंदर आणि थॉमसचा मुलगा अजीतशी झाली होती. या दोघांनी त्यांना जेवणासाठी हॉटेलमध्ये नेले आणि त्याच हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर सुंदर, सुब्रमण्यम, थॉमस आणि अजीत अशा चौघांनी त्यांना कराईकुडी येथील अध्यक्ष राजन यांच्या गेस्ट हाऊसमध्ये आणले होते. तिथे राजनशी ओळख करुन दिल्यानंतर त्यांच्यात कर्जाविषयी सविस्तर बोलणी झाली होती. त्यांच्या कंपनीचे कागदपत्रे पाहिल्यानंतर राजनने त्यांना दिडशे कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आश्वास दिले होते. त्यासाठी त्यांना दोन टक्के रजिस्ट्रेशन फी असे तीन कोटी रुपये केरळ सरकारकडे जमा करावे लागतील असे सांगितले. राजन हे स्थानिक नामांकित राजकीय नेते होते, त्यांची अनेक मंत्र्यासह राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते. निवडणुकीत ते त्यांच्या मतदारांना फ्री वस्तू देतात. गेल्या वेळेस त्यांनी सर्वांना टिव्ही दिले होते,
आगामी निवडणुकीत त्यांनी सर्वांना फ्रीमध्ये वॉशिंग मशिन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पन्नास हजार वॉशिंग मशिन ते त्यांच्याकडून घेतील असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तसे झाल्यास त्यांना चांगला फायदा होणार होता. त्यातच रजिस्ट्रेशन फीची रक्कम केरळ सरकारमध्ये जमा होणार होती, त्यामुळे त्यांनी त्यांची मागणी मान्य केली होती. त्यामुळे त्यांनी काही दिवसांत तीन कोटी रुपये जमा करुन संंबंधित आरोपींच्या बँक खात्यात जमा केले होते. २२ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्यात एक करार होणार होता. त्यामुळे ते त्यांच्या सर्व कागदपत्रांसह त्रिवेंद्रम येथे गेले होते. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर त्यांना २५ कोटीचे सहा डी डी असे दिडशे कोटी रुपयांचे धनादेश मंजूर झाल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी ते डीडी बँकेत जमा किंवा त्यांना दिले नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर ते सर्वजण त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. तसेच त्यांनी कराराची प्रत मागून घेतल्यानंतर त्यात त्यांना पंधरा लाखांचे कर्ज देण्यात येणार असून रजिस्ट्रेशनसाठी दहा लाख रुपये घेऊन फक्त तीस हजार रुपये जमा केल्याचे नमूद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे दिडशे कोटीच्या कर्जासाठी दिलेले तीन कोटी रुपये परत मागितले. मात्र या आरोपींनी त्यांना पैसे परत केले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या तामिळनाडूच्या मित्राला सांगितला. या मित्राच्या मध्यस्थीने आरोपींनी त्यांना एक कोटी रुपये परत केले होते. मात्र उर्वरित दोन कोटीचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
ही रक्कम आरोपीकडून परत मिळण्याची शक्यता नसल्याने राकेश दुगर यांनी पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सुरेश ऊर्फ नित्यानंद नायडू, सुंदर, थॉमस, त्याचा मुलगा अजीत, सुब्रमण्यम, राजेंद्रन चंद्रन, राजन आणि ए सेतुराज अशा आठजणांविरुद्ध बोगस कराराचे दस्तावेज बनवून दोन कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच १० फेब्रुवारी २०२४ रोजी या गुन्ह्यांत एम. थॉमस, ए सेतूराज आणि शमुगसुंदरम या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तिघांविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात इतर पाच आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांचा शोध सुरु असताना या गुन्ह्यांत दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या राजशेखर ऊर्फ राजन याला पवई पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. इतर चारजण अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.