मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – जागेसह पाण्यावरुन विमान कंपनीच्या कर्मचारी महिलांना शिवीगाळ करुन त्यांच्याशी हुज्जत घालणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. बंदना संजय मिश्रा असे या महिलेचे नाव असून ती साकिनाका येथील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडच्या टिळकनगरची रहिवाशी आहे. सोमवारी रात्री वाराणसीहून मुंबईहून निघालेल्या एका खाजगी विमानात घडलेल्या या प्रकाराने इतर प्रवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोनाली रमेश जाधव ही महिला नवी मुंबईत राहत असून एका खाजगी विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून कामाला आहे. सोमवारी ती वाराणसी येथून मुंबईला येणार्या विमानात तिच्या सहकार्यासोबत कर्तव्य बजावत होती. काही कारणामुळे विमानाला टेक ऑफ होण्यास अर्धा तास उशिर झाला होता. या विमानात एकूण १७५ प्रवासी करत होते, त्यात बंदना मिश्रा हिचा समावेश होता. विमान टेक ऑफ झाल्याने तिने तिची सीट बदलून हवी आहे असे सांगितले, मात्र दुसर्या सीटवरील महिलेने तिची जागा बदलून देण्यास नकार दिला. काही वेळानंतर ती वॉशरुम गेली. तिथे पाण्यावरुन तिने विमानातील महिला कर्मचार्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह वैमानिकला शिवीगाळ करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. वारंवार विनंती करुनही ती शांत राहत नव्हती. सीट बदलून देण्यासह पाण्यावरुन तिची शिवीगाळ सुरुच होती. विमान प्रवाशादरम्यान तिने रेड वॉर्निंग कार्डचे उल्लघंन केले होते. ही माहिती नंतर मुंबईतील विमानतळावरील सुरक्षाक्षकांना देण्यात आली होती. त्यामुळे विमान लॅड होताच तिला या सुरक्षारक्षकांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. नंतर तिला पुढील कारवाईसाठी एअरपोर्ट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी सोनाली जाधव यांच्या तक्रारीवरुन बंदना मिश्राविरुद्ध पोलिसांनी ३३६ भादवी सहकलम २२ २३, २९ विमान अधिनियिम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिने घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिच्या गोंधळामुळे विमानात प्रचंड तणाव तसेच सहप्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.