दहा लाखांच्या कर्जासाठी फ्लॅटच्या कागदत्रांचा गैरवापर करुन फसवणुक
फ्लॅटची दिड कोटींना विक्री करुन फसवणुक करणार्या तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून एका ७३ वर्षांच्या वयोवृद्धाच्या फ्लॅटचे कागदपत्रे घेऊन या कागदपत्रांचा गैरवापर करुन फ्लॅटची दिड कोटींना विक्री करुन फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. राघवेंद्र पुजारी, पियुष शहा आणि उर्विल शहा अशी या तिघांची नावे असून या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मनजीत कौर आनंद हे अंधेरीतील आंबोली, आरटीओ कार्यालयाजवळील होरायझन हाईट्स अपार्टमेंटमध्य राहतात. डिसेंबर २०२२ रोजी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. मनजीत कौर यांना दहा लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. या कर्जाविषयी त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. या कर्जासाठी त्यांनी तारण म्हणून त्यांच्या फ्लॅटचे कागदपत्रे त्यांच्याकडे विश्वासाने सोपविली होती. मात्र या तिघांनी या फ्लॅटचा परस्पर खरेदी-विक्रीचा सौदा केला. फ्लॅटची सुमारे दिड कोटी रुपयांना विक्री केली. ही रक्कम मनजीत कौर यांच्या बँक खात्यात जमा करुन नंतर ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. हा संपूर्ण व्यवहार मनजीत कौर यांना अंधारात ठेवून झाला होता.
एप्रिल २०२४ रोजी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच त्यांना धक्काच बसला होता. त्यांनी कोणासोबतही फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा बोलणी केली नव्हती. त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली दिड कोटी रुपये त्यांनी राघवेंद्र पुजारी, पियुष शहा आणि उर्विल शहा यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले नव्हते. तरीही या तिघांनी कर्जासाठी घेतलेल्या कागदत्रांचा गैरवापर करुन त्यांच्या फ्लॅटची खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन दिड कोटीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ४०६,४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.