क्रेडिटवर दिलेल्या ७० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
भुलेश्वर येथील घटना; तीन व्यापार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – क्रेडिटवर दिलेल्या सुमारे ७० लाखांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार भुलेश्वर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील दोघांविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भरत सोनिग्रा आणि सुभाष सोनिग्रा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पुण्याच्या निगडी, आर्केड तिलक रोडचे रहिवाशी आहे.फसवणुकीच्या या गुन्ह्यांत लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.
धनेशकुमार छगनलाल तोगानी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत परळच्या लालबाग परिसरात राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची सोनिग्रा यांच्याशी ओळख झाली होती. ते दोेघेही ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा पुण्यात सोन्याचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. या ओळखीनंतर त्यांच्या दागिन्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता. सुरुवातीला या दोघांनी त्यांच्याकडून काही दागिने खरेदी केले होते, त्याचे पेमेंट वेळेवर देऊन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. ऑगस्ट २०२१ ते १३ मार्च २०२३ या कालावधीत त्यांनी त्यांच्याकडून ८० लाख ३६ हजाराचे १५६० ग्रॅम वजनाचे विविध दागिने क्रेडिटवर घेतले होते. त्यासाठी त्यांनी पावणेदहा लाखांचे पेमेंट केले होते. मात्र उर्वरित ७० लाख ६६ हजार रुपयांचे पेमेंट त्यांच्याकडून करण्यात आले होते. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. या दागिन्यांची परस्पर विक्री करुन भरत आणि सुभाष यांनी त्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर धनेशकुमार तोगानी यांनी व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिश केल्यानंतर भरत आणि सुभाष यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच पोलिसांची एक टिम पुण्याला चौकशीकामी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी इतर ज्वेलर्स व्यापार्याकडून क्रेडिटवर सोने घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.