मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून फिरोज इस्माईल शेख या ३२ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपीने पेव्हर ब्लॉकने मारहाण करुन हत्या केल्याची घटना ऍण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच मोहम्मद फारुख अब्दुल रेहमान शेख या आरोपीस ऍण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही घटना रविवारी रात्री अकरा ते पहाटे साडेचारच्या दरम्यान ऍण्टॉप हिल येथील नूरा बाजार, राजीव गांधीनगरकडे जाणार्या रस्त्यावर घडली. अब्दुल समद मुनावर खान हा ऍण्टॉप हिल येथे राहत असून व्यवसायाने चालक म्हणून काम करतो. फिरोज आणि मोहम्मद उस्मान ऊर्फ सोनू हे दोघेही त्याचे चांगले मित्र आहे तर आरोपी मोहम्मद फारुख हा त्याच्या परिचित असून तोदेखील याच परिसरात राहतो. रविवारी रात्री या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्यातून त्याने त्याला धक्काबुक्की करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे आलेल्या फिरोजसह सोनू या दोघांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या भांडणात मध्यस्थी केली म्हणून रागाच्या भरात मोहम्मद फारुखने फिरोजला आता तुला संपवून टाकतो अशी धमकी देत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यावर पेव्हर ब्लॉकने हल्ला केला होता. या हल्ल्यात फिरोज हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अब्दुल खानकडून पोलिसांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद फारुख शेख याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मोहम्मद फारुखला ऍण्टॉप हिल परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.