मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जून २०२४
मुंबई, – इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांची विक्री केल्यास जास्त पैसे मिळत असल्याने घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या एका २३ वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अमीतकुमार रमेशकुमार राय असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडेन पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राऊंड जप्त केले आहेत. घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. झटपट पैशांसाठी शस्त्रांची विक्री करणे अमीतकुमारला चांगलेच महागात पडले आहे.
गेल्या काही महिन्यांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबई शहरात विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. अशा प्रकारे शस्त्रांची विक्री करणार्या आरोपींविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच अंधेरी परिसरात काही तरुण इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने अंधेरीतील बी. डी सावंत रोड, जे. बी नगरच्या चरणसिंग कॉलनी बसस्टॉपजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी तिथे अमीतकुमार आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राऊंड सापडले. या पिस्तूलची विक्रीसाठी तो तिथे आला होता. शस्त्रांची विक्री करुन त्याला झटपट पैसे कमावायचे होते, मात्र त्याचा पहिलाच प्रयत्न फसला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ते पिस्तूल कोणी दिले आणि तो कोणाला विक्रीसाठी आला होता याचा आता पोलीस तपास करत आहेत.