मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जून २०२४
मुंबई, – अकरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन विनयभंग झाल्याचा प्रकार गोरेगाव आणि वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वडाळा टी टी आणि दिडोंशी पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
३३ वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून तिला एक मुलगी (अकरा वर्ष नऊ महिने) आहे. मंगळवारी ही मुलगी तिच्या राहत्या घरी होती. यावेळी तिच्या घरी चहा विक्री करणार्या एका २४ वर्षांच्या तरुणाने प्रवेश केला. त्याने तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार नंतर मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने दिडोंशी पोलिसात आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३५४ भादवी सहकलम ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना वडाळा परिसरात घडली. ३६ वर्षांचे तक्रारदार वडाळा परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांना अकरा वर्षांची एक मुलगी आहे. तीन दिवसांपूर्वी ही मुलगी तिच्या घराच्या दिशेने जात होती. यावेळी २२ वर्षांच्या आरोपीने पाठलाग करुन तिच्या छातीवर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर बघून घेईल अशी धमकी दिली होती. घरी आल्यानंतर तिने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तिला वडाळा टी टी पोलीस ठाण्यात आणून तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.