अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचारप्रकरणी प्रियकराला अटक
गोवंडीतील घटना; धमकी देऊन अत्याचार केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जून २०२४
मुंबई, – गोवंडी येथे राहणार्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी २६ वर्षांच्या आरोपी प्रियकराला देवनार पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने पिडीत मुलीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची तसेच काकासह आजीला घराबाहेर काढून देण्याची धमकी देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सोळा वर्षांची पिडीत मुलगी आणि आरोपी गोवंडीतील देवनार परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. या दोघांचे प्रेमसंबंध होते. सोमवारी २४ जूनला दुपारी साडेतीन वाजता त्याने तिला त्याच्या घरी बोलाविले होते. यावेळी त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची तसेच तिच्या काका आणि आजीला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तिला त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. नंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. तिच्याकडून घडलेला प्रकार समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी तिला देवनार पोलीस ठाण्यात आणले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचाच प्रियकर आरोपीविरुद्ध ३७६, ५०६, ५०६ (२) भादवी सहकलम ४, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मंगळवारी सकाळी आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलीची मेडीकल करण्यात आली असून लवकरच आरोपीची मेडीकल होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.