मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जून २०२४
मुंबई, – बँक खात्यातील व्यवहार सस्पेंड करण्यात आले असून ते पूर्ववत करण्यासाठी नवीन ऍप्लिकेशन डाऊनलोड करुन इनस्ट्रॉल करण्यास प्रवृत्त करुन एका महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे सहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरीत समोर आला आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.
३० वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या वयोवृद्ध आई-वडिल आणि भावासोबत अंधेरी येथे राहते. ती एका सेलिब्रिटी जहाजावरील खाजगी कंपनीत कामाला असून जहाजावर सहा ते सात महिने काम केल्यानंतर तिला दोन ते तीन महिन्यांचा ब्रेक असतो. रविवारी २३ जूनला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एक मॅसेज आला होता. त्यात तिच्या बँक खात्याचा व्यवहार सस्पेंड करण्यात आला आहे. ते पूर्ववत बँकेने नवीन ऍप बनविले असून ते ऍप डाऊनलोड करुन इनस्ट्रॉल करण्यास सांगितले. त्यामुळे तिने ती लिंक ओपन करुन तिचे मोबाईल, जन्मतारीखसह इतर माहिती अपलोड केली होती. ही माहिती अपलोड केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून १ लाख ९१ हजार ७९४ रुपये डेबीट झाले होते. त्यामुळे तिने बँकेच्या हेल्पलाईनवर क्रमांकावर कॉल करुन तक्रार केली होती. याच दरम्यान तिला आणखीन तीन ओटीपी प्राप्त झाले होते. मोबाईलवर आलेले मॅसेज पाहिल्यानंतर तिला तिच्या खात्यातून १ लाख ४९ हजार, एक लाख आणि १ लाख ५२ हजार रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारे बँकेचे बोगस लिंक पाठवून अज्ञात सायबर ठगाने तिच्या बँक खात्यातून चार व्यवहारातून सहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. या प्रकारानंतर तिने सायबर हेल्पलाईनच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार करुन अंधेरी पोलिसांना ही माहिती दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.