मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जून २०२४
मुंबई, – होनेस्ट द होलसेल हब या कंपनीचा मालक असल्याची बतावणी करुन मॅजिक होली बलून खरेदीच्या नावाने एका व्यावसायिकाची ४ लाख ३८ हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरोपीस सुरत येथून कांदिवली पोलिसांनी अटक केली. देव अनिलकुमार लिंबाचिया असे या २२ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याचा हेअर कटिंग सलून असल्याचे पोलिसांनी सांगितले.फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. देवने सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप असून त्याने उघडलेल्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील ३० वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते कांदिवली येथे राहतात. २० एप्रिल २०२४ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो होनेस्ट द होलसेल हब कंपनीचा मालक असल्याचे सांगितले. मॅजिक होली बलून खरेदी करण्याचा बहाणा करुन त्याने त्यांना ४ लाख ३८ हजार ६०० रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. मॅजिक बलून न देता त्याने त्यांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढताना देव लिंबाचिया याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने त्याला सुरत येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत देव व त्याच्या इतर दोन सहकार्यांनी बँकेत बोगस खाते उघडले होते. या बँक खात्याचा वापर फसवणुकीसाठी सायबर ठगाकडून केले जात होता. याकामी या तिघांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. देव हा सुरतच्या अडाजन, लॉर्ड कृष्णा स्कूलजवळील जकात नाका, रामदेव अपार्टमेंटमध्ये राहत असून तिथेच त्याचा हेअर कटिंग सलूनचे एक दुकान आहे. या गुन्ह्यांत भरत वासदानी ऊर्फ बंटी आणि राहुल कहार या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.