एसआर फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेसह दोघांची फसवणुक
३३ लाखांना गंडा घालणार्या आरोपी दलालाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मृत भावाच्या मालकीच्या फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका वयोवृद्ध महिलेसह दोघांची सुमारे ३३ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संदीप अरविंद भाटे या आरोपी दलालाविरुद्ध दहिसर पोलिसांनी दोन स्वतंत्र बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
६० वर्षांची प्रतिभा प्रफुल्ल नागवेकर ही महिला दहिसर येथील मिस्किटानगर, रंजनीगंधा अपार्टमेंटमध्ये राहते. तिचे पती रेल्वेतून निवृत्त झाले असून त्यांचे पेंशन तिला मिळते. २०१७ साली तिने दहिसर येथील डोंगरी, शांतीनगरातील जनकल्याण इमारतीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. ऑक्टोंबर २०१८ रोजी तिचा मुलगा निलेशच्या मित्राने त्याची ओळख संदीप भाटेशी करुन दिली होती. संदीप हा रुम खरेदी-विक्री दलालीचे काम करतो. त्याने निलेशला बोरिवलीतील काजूपाडा, साईद्वारका एसआरए इमारतीचा एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट त्याचा भाऊ प्रसन्ना भाटे याच्या मालकीचा असून त्याला तो फ्लॅट एसआरएतर्ंगत मिळाला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रतिभा ही निलेशसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. फ्लॅट पसंद पडल्यानंतर त्यांच्यात २७ लाख ५० हजारामध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. यावेळी त्यांनी त्याला साडेआठ लाख रुपये आगाऊ दिले होते.
जानेवारी २०२२ रोजी प्रसन्नाचे निधन झाले होते. यावेळी संदीपने त्याच्या भावाच्या निधनाची माहिती देऊन उर्वरित रक्कम देऊन फ्लॅटचा ताबा घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रतिभाने तिच्या दहिसर येथील फ्लॅटची विक्री करुन संदीपला सुमारे अठरा लाख रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचा करार झाला होता. यावेळी त्याने प्रसन्नाच्या याच्या हस्ताक्षर असलेले बोगस दस्तावेजाची नोटरी केली होती. मृत भावाच्या एसआरए फ्लॅटच्या नावाने त्याने त्यांच्याकडून २६ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र फ्लॅटचा ताबा दिला नाही. संदीपकडून फ्लॅटबाबत ठोस कारवाई होत नसल्याने प्रतिभा नागवेकर यांनी त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. मात्र त्याने पैसे परत न करता तिची फसवणुक केली होती.
अशाच अन्य एका घटनेत मनोज बाबला मोरे यां विरार येथे राहणार्या व्यक्तीची संदीपने फसवणुक केली. याच फ्लॅटसाठी त्याने त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले, मात्र फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मनोजकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने त्याने त्यांना सव्वातीन लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित पावणेसात लाखांचा परस्पर अपहार करुन त्याची फसवणुक केली होती. त्यामुळे प्रतिभा नागवेकर आणि मनोज मोरे यांनी दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संदीप भाटेविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संदीप भाटेविरुद्ध पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकच संदीपची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.