मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जून २०२४
मुंबई, – जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुख्यार सय्यद यांच्या अन्यायाविरोधात सरकारी दरबारी न्याय मिळत नसल्याने मानसिक नैराश्यातून परभणीच्या एका ३९ वर्षांच्या मजुराने मंत्रालयासमोरच स्वतच्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. अविनाश पी श्रीशैल्स ग्याल असे या मजुराचे नाव असून त्याच्याविरुद्घ मरिनड्राईव्ह पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मंत्रायाच्या प्रवेशद्वार गेटजवळ घडली. अविनाश हा परभणी येथील जिंतूर, बलसा रोडचा रहिवाशी असून तिथे तो त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्याच्या मुख्यार सय्यद यांनी कारवाई करताना त्याला बेदम मारहाण केली होती. त्याला अपमानास्पद वागणुक दिली होती. त्याच्याविरुद्ध झालेल्या अन्यायाबाबत त्याने सरकारी दरबारीला न्याय मागण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मानसिक नैराश्यातून तो मंत्रालयाजवळ आला होता. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता त्याने मंत्रालयाच्या गेटसमोर त्याच्याकडील डिझेल स्वत ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला होता. या प्रकारानंतर त्याला मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथे त्याच्याविरुद्ध सुरेश यादवराव गवई यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अविनाशविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला ४१ (१), (अ) सीआरपीसी अंतर्गत नोटीस बजाविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.