शहरात दोन घटनेत अल्पवयीन मुलासह तरुणाचा मृत्यू

भायखळा-गोरेगाव येथील घटना; दोन स्वतंत्र एडीआरची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत एका अकरा वर्षांच्या मुलासह एकोणीस वर्षांच्या तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा आणि गोरेगाव परिसरात घडली. मुस्तफा इब्राहिम चुनावाला या १९ वर्षांच्या तरुणाचा सहाव्या मजल्यावरुन पडून तर आदिल बद्रेआलम चौधरी या अकरा वर्षांच्या मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी भायखळा आणि दिडोंशी पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

मुस्तफा हा माझगाव येथील नेसबीट रोड, एक्वा जेम टॉवर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ६०३ मध्ये राहत होता. रविवारी सकाळी सहा वाजता तो सहाव्या मजल्यावरुन तिसर्‍या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती रुग्णालयातून प्राप्त होताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मुस्तफाच्या आईची जबानी नोंदविण्यात आली असून या घटनेबाबत तिने कोणावरही संशय व्यक्त केला नाही. मुस्तफाला झोपेत चालण्याची सवय होती, त्यातून हा अपघात झाला असावा असा संशय तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत व्यक्त केले.

दुसरी घटना रविवारी दुपारी दिड वाजता गोरेगाव येथील मिनाताई ठाकरे उद्यानाजवळ घडल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांनी सांगितले. आदिल हा अकरा वर्षांचा मुलगा संतोषनगर परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. रविवारी दुपारी दिड वाजता तो त्याच्या मित्रांसोबत गोरेगाव येथील मिनाताई ठाकरे उद्यानाजवळ क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. यावेळी चेंडू आणण्यासाठी तो संरक्षक भिंतीजवळ गेला असता तिथे असलेल्या जाळीला असलेल्या विजेचा शॉक लागून तो बेशुद्ध झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. क्रिकेट खेळणार्‍या मुलांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही घटनेनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page