मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – काम असल्याची बतावणी करुन पंधरा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर चुलत भावानेच लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी २३ वर्षांच्या आरोपी भावाविरुद्ध पवई पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
१५ वर्षांची पिडीत मुलगी ही पवई परिसरात राहते. आरोपी हा तिचा चुलत भाऊ असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या आझमगढचा रहिवाशी आहे. १ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत त्याने तिला रुममध्ये काम आहे असे सांगून त्याच्या घरी आणले. तिथेच त्याने तिच्यावर जबदस्तीने लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याने तिच्यावर तीन ते चार वेळा लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. बदनामीसह भावाच्या जिवावर असलेला धोका पाहता तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र अलीकडेच तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात आरोपी भावाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (एफ), (३), (डी), (२), ५०६ (२), ३२३ भादवी सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत आरोपी भावाला अटक झाली नसून त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लैगिंक अत्याचारप्रकरणी बॉक्सिंग कोचला अटक
दुसर्या घटनेत एका बारा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी साहिल बपेरकर या बॉक्सिंग कोचला भायखळा पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर भादवीसह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत माझगाव परिसरात राहत असून तिला बारा वर्षांची मुलगी आहे. ती माझगाव येथील एका किक बॉक्सिंग क्लाससाठी जात होती. तिथेच साहिल हा कोच म्हणून काम करत होता. फेब्रुवारी ते जून महिन्यांत साहिलने अनेकदा क्लासनंतर तिला जास्त वेळ थांबवून तिला रिफ्युजी परिसरात आणून तिच्यावर जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अश्लील चाळे करुन तिच्याशी लैगिंक अत्याचार केला होता. तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करुन नकार दिल्यानंतर तिला मारहाण केली होती. हा प्रकार अलीकडेच तिने तिच्या तक्रारदार आईला सांगितला होता. या माहितीनंतर तिने भायखळा पोलीस ठाण्यात साहिलविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी साहिलविरुद्ध लैगिंक अत्याचारासह विनयभंग, मारहाण करणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.