फसवणुकीच्या गुन्ह्यांत हैद्राबादच्या ज्वेलर्स व्यापार्याला अटक
२७ लाखांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड ज्वेलर्स व्यापार्याला एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाने हैद्राबाद येथून अटक केली. बंटी काबरा ऊर्फ बजरंगप्रसाद ओमप्रकाश काबरा असे या व्यापार्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर सुमारे २७ लाखांचा दागिन्यांचा अपहार करुन एका खाजगी ज्वेलर्स कंपनीची फसवणुक केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वांद्रे येथे राहणारे पंकजकुमार हस्तीमल जगावत हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांची अंधेरीतील महाकाली गुंफा रोड, कार्पोरेट ऍव्हन्यूमध्ये शांती गोल्ड इंटरनॅशनल लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत त्यांच्यासह मनोजकुमार जैन आणि शशांक भवरलाल जगावत हे संचालक म्हणून काम करतात. २००३ साली सुरु केलेल्या या कंपनीत सोने बनविण्याचे काम चालते. मुंबईसह संपूर्ण भारतात त्यांचे अनेक ग्राहक असून त्यांच्या ऑर्डरप्रमाणे त्यांना दागिने बनवून दिले जातात. बंटी काबरा हा त्यांचा एक ग्राहक असून त्याची हैद्राबादच्या गोशा महल, मालाकुंता रोडवर अमृत ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलर्स दुकान आहे. फेब्रुवारी २०१९ रोजी तो त्यांच्या कंपनीत आला होता. यावेळी त्याने विविध डिझाईनचे दागिने बघितले. त्यानंतर त्याने गळ्यातील नेकलेस आणि कानारिंग रिंग पसंद केल्या होत्या. त्याच्या ऑर्डरप्रमाणे त्याला दागिने पाठविण्यात आले होते. त्याचे त्याने पेमेंट करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता.
नोव्हेंबर २०२० साली त्याने त्यांच्या कंपनीतून सुमारे साडेबत्तीस लाख रुपयांचे ६४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले होते. त्यापैकी १६ लाख २६ हजार रुपये त्याने आरटीजीएच्या माध्यमातून पेमेंट केले. ऑगस्ट २०२१ रोजी त्याने आणखीन १०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेतले होते. त्यानंतर त्याच्याकडून त्यांना सुमारे २७ लाखांचे पेमेंट येणे बाकी होते. मात्र वारंवार विचारणा करुनही तो पेमेंट करत नव्हता. त्यांच्याकडून घेतलेल्या दागिन्यांची मार्केटमध्ये विक्री करुन त्यांचे पेमेंट न देता त्याने त्यांच्या कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत बंटी काबराविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. त्याच्या अटकेसाठी एमआयडीसी पोलिसांचे एक विशेष पथक हैद्राबादला गेले होते. या पथकाने हैद्राबाद येथून बंटी काबराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पंकजकुमार जगावत यांच्याकडून घेतलेल्या दागिन्यांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.