फॉरेक्स ट्रेडिंग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणुक
टिव्ही कलाकारांची ईडीने चौकशी करुन जबाब नोंदविला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जुलै २०२४
मुंबई, – फॉरेक्स ट्रेडिंग ऍपच्या माध्यमातून सुमारे ५०० कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी ईडीने कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईडीने काही टिव्ही कलाकारांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेतले आहे. त्यात अभिनेत्री क्रिस्टन डिसुझा आणि अभिनेता करण वाही यांचा समावेश आहे. या दोघांनाही जाहिरातीसाठी पेमेंट करण्यात आले होते. या पेमेंटबाबत त्यांची चौकशी करण्यात आली आहे. याच प्रकरणात टिव्ही अभिनेत्री आणि मॉडेल निया शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीकडून देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच तिची या अधिकार्यांकडून चौकशी होणार आहे.
पुण्यातील शिवाजीनगर ोलीस ठाण्यात फॉरेक्स ट्रेडिंग ऍपप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. मनी लॉड्रिंगचा प्रकार उघडकीस येताच ईडीने स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. ऑक्टाएफएक्स ऍप आणि वेबसाईट फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये व्यवहार करण्यासाठी कंपनीने आरबीआयची परवानगी घेणे बंधनकार होते, मात्र तशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यानंतर सोशल मिडीयावरुन प्लॅटफॉमचाम मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्यात आला आहे. ट्रेडिंग ऍप आणि वेबसाईटवर विविध भारतीय बँकांची खाती दाखवून त्यात नंतर मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईसह चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीतील कंपनीच्या कार्यालयात ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. कंपनीने गुंतवणुकदार आणि इतरांकडून कोट्यवधी रुपये घेऊन तो पैसा ई-वॉलेट खात्यासह डमी संस्थांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केला होता.
अशा प्रकारे त्यांनी विदेशी चलन कायद्यांचे उल्लघंन करुन गुंतवणुकदारांची सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणुक केली होती. ही रक्कम नंतर बोगस स्थापन करण्यात आलेल्या मालवाहतूक सेवा, सेवांची आयात इत्यादींच्या आडून संबंधित संस्थाच्या विदेशी बँक खात्यात पाठविण्यात आली होती. या संपूर्ण कटामागे सनदी लेखापाल आणि व्यावसायिकाचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आले होते. त्यांनीच ही रक्कम बोगस प्रमाणपत्र देऊन स्पेन, रशिया, जॉर्जिया आणि दुबईतील विविध खात्यातील समूह संस्थाच्या मालकाद्वारे जमा करण्यात आली होती. त्यासाठी विदेशात वास्तव्यास असलेल्या काही भारतीय व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत ईडीने केलेल्या कारवाईत ३५ कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात क्रिप्टो करन्सी, बँक डिपॉझिट आणि सोन्यांच्या नाणींचा समावेश असल्याचे बोलले जाते.