मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ जुलै २०२४
कोल्हापूर, – घोडागाडीच्या जुन्या वादातून सुशांत दिपक कांबळे या १८ वर्षांच्या बालपणीच्या मित्राची तिघांनी तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. हत्येनंतर पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्यांना शहापूर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. आतिष ऊर्फ टक्या दत्तात्रय नेटके, आर्यन सरदार चव्हाण आणि बाळू ऊर्फ प्रदीप पारस यादव अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही पुढील कारवाईसाठी शहापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
४ जुलैला शहापूरच्या डॉ. सरोजिनी नायडू विद्यालय क्रमांक ४३ च्या मागे सुशांत कांबळे या तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याची अज्ञात मारेकर्याने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती. त्याच्या तोंडाला, पाठीला, मांडीला तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. सुशांत हा कोल्हापूरच्या हातकणंगले, इंचलकरंजीच्या आसरा नगर परिसरात राहत होता. या हत्येनंतर त्याची आई दिपाली दिपक कांबळे हिच्या तक्रारीवरुन शहापूर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध १०३ (१), ३ (५) भारतीय न्यास सहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता. या हत्येची पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, संदीप जाधव, शेष मोरे, सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, प्रशांत कांबळे, पोलीस नाईक सागर चौगुले, संजय कुंभार, महेश खोत, चालक राजेंद्र वरांडेकर, साजिद कुरणे, प्रमोद भांगरे, मोहिते आणि अर्जुन फातले यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन या हत्येच्या कटात अतिश नेटके, आर्यन चव्हाण आणि प्रदीप पारस या तिघांचे नावे समोर आली होती. ते तिघेही कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मैदान परिसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तिन्ही संशयित मारेकर्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या तिघांची नावे आतिष ऊर्फ टक्या दत्तात्रय नेटके, आर्यन सरदार चव्हाण आणि बाळू ऊर्फ प्रदीप पारस यादव असल्याचे उघडकीस आले. ते तिघेही इंचलकरंजीच्या सहकारनगर, गणेशनगर आणि शहापूरच्या आरजेकेनगरचे रहिवाशी होते.
तपासात आतिष आणि मृत सुशांत हे बालपणीचे मित्र होते. त्यांच्यात घोडेगाडीवरुन वाद होता. घोडागाडीच्या स्पर्धेवरुन त्यांच्यातील विकोपास गेला होता. त्यातून आतिषने आर्यन आणि प्रदीपचा काटा काढण्याची योजना बनविली होती. ते तिघेही त्याला घेऊन डॉ. सरोजिनी नायडू विद्यालयाजवळ घेऊन आले होते. तिथे त्यांनी सुशांतची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती. या हत्येनंतर ते तिघेही पळून गेले होते. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करुन या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. अटकेनंतर या तिघांनाही शहापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.