पोलीस हवालदाराला ऑनलाईन गंडा घालणार्या ठगाला अटक
अन्य सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष शोधमोहीम
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ जुलै २०२४
मुंबई, – निर्मलनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड ठगाला तीन महिन्यानंतर वांद्रे पोलिसांनी अटक केली. अजयकुमार सरोगी साव असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अन्य सहकार्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. या टोळीने बँक खात्यासह कुठलाही ओटीपी क्रमांक शेअर केला नसताना या पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून पैशांचा अपहार केला होता.
५२ वर्षांचे तक्रारदार वांद्रे येथील आर. के पाटणकर मार्ग, वांद्रे पोलीस वसाहतीत राहत असून सध्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ३१ मार्च २०२४ रोजी ते २४ तासांच्या लॉकअप ड्यूटीवर हजर झाले होते. रात्री आठ वाजता त्यांना त्यांच्या बँक खात्यातून काही रक्कम डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त झाला होता. दुसर्या दिवशी घरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यातून ९० हजार रुपये डेबीट झाल्याचे समजले होते. अज्ञात व्यक्तीने बँक खात्याची कुठलीही माहिती किंवा ओटीपी क्रमांक शेअर केला नसताना त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम दुसर्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी गंभीर दखल घेत सायबर सेलसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले ोते. या आदेशानंतर या पथकाने तांत्रिक माहितीवरुन अजयकुमारला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. फसवणुकीची रक्कम त्याच्याच बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.