खाजगी कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांना गंडा
४४३ गुंतवणुकदारांची २०.१४ कोटीची फसवणुक झाल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ जुलै २०२४
मुंबई, – खाजगी कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन्ही संचालकाविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रईसा खान पुनावाला आणि मुस्तफा बेग अशी या दोघांची नावे असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या दोघांनी आतापर्यंत ४४३ गुंतवणुकदारांची २० कोटी १४ लाखांची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
बिल्कीस अफरोज शेख ही महिला सांताक्रुज येथील रिलीफ रोडच्या दौलतनगर परिसरात राहते. बारा वर्षांपूर्वी तिची रईसा खान आणि मुस्तफा बेग यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीत त्यांनी तिला त्यांच्या मालकीची आर. के इंटेरियर नावाची एक कंपनी आहेत. या कंपनीत तिला गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करताना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. अल्पावधीत जास्त परवाता मिळत असल्याने तिने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केली होती. तिच्यासह कंपनीत इतर काही लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर अनेकांना ठराविक महिने चांगला परवाता मिळत होता. त्यामुळे अनेकांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ४४३ जणांनी २० कोटी १४ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र नंतर त्यांना व्याजाची रक्कम मिळणे बंद झाले होते. वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिली नाही. त्यामुळे या गुंतवणुकदारांनी वांद्रे येथील लोकल कोर्टात रईसा पुनावाला आणि मुस्तफा बेग यांच्याविरुद्ध एक खाजगी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण होऊन वांद्रे कोर्टाने सांताक्रुज पोलिसांना दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन या संपूर्ण गुन्ह्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर बिल्कीस शेख या महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रईसा पुनावाला आणि मुस्तफा बेग या दोघांविरुद्ध ४०६, ४०९, ४२० भादवी सहकलम ३, ४ एमपीआयडी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अनेक गुंतवणुकदारांना कंपनीत गुंतवणुक करण्यास सांगून कोट्यवधी रुपयांची कशा प्रकारे विल्हेवाट लावली, या पैशांची त्यांनी कुठे गुंतवणुक केली आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.