मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरची बाईकला धडक झालेल्या अपघातात मंगेश बाळासाहेब कांबळे या ३६ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी स्वाती मंगेश कांबळे ही गंभीररीत्या जखमी झाली. तिच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर आरोपी डंपरचालक पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी समतानगर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता कांदिवलीतील अशोकनगर, अशोक चक्रवर्ती मार्गावरील न्यू कल्पतरु इमारतीसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वाती कांबळे ही कांदिवलीतील हनुमाननगर, नवरंगवाडीत तिचा पती मंगेश, सासरे बाळासाहेब, सासू रेखा आणि मुलगा शुभम यांच्यासोबत राहते. स्वाती ही महानगरपालिकेत तर तिचा पती मंगेश एका इलेक्ट्रीक शॉपमध्ये नोकरीस होता. रविवारी ती तिच्या पतीसोबत जवळच असलेल्या एका पार्लरमध्ये गेली होती. दुपारी चार वाजता पार्लरमधून घरी येताना साईनगर येथून अशोक चक्रवर्ती रोडच्या दिशेने जाताना एका डंपरने त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यात ते दोघेही पती-पत्नी गंभीररीत्या जखमी झाले होते.
जखमी झालेल्या दोघांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे मंगेश कांबळे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर स्वातीची दुखापत गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी स्वातीच्या जबानीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध हलगजीपणाने डंपर चालवून तिच्या पतीच्या मृत्यूस तर तिला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.