बेस्ट बस प्रवासादरम्यान २६ वर्षांच्या महिलेचा विनयभंग
कुलाबा-गावदेवीमधील घटना; बसवाहकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२४
मुंबई, – कामावर जाणार्या एका २६ वर्षांच्या विवाहीत महिलेचा प्रवाशांनी भरलेल्या बसमध्येच बसवाहकाने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कुलाबा-गावदेवीदरम्यान घडली. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञात बसवाहकाविरुद्ध कुलाबा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लवकरच आरोपी बसवाहकावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार महिला ही कुलाबा येथील कॅप्टन प्रकाश पेटे मार्गावर राहत असून ती केअरटेकर म्हणून काम करते. गुरुवारी ४ जुलैला सकाळी सव्वासात वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. गरीब जनता नगर येथून गावदेवीतील पारसी हॉस्पिटलला जाण्यासाठी तिने १३२ क्रमांकाची बस पकडली होती. यावेळी तिच्याकडे आरोपी बसवाहक आला आणि त्याने तिच्याकडे तिकिट घेण्याबाबत विचारणा केली. तिने त्याला चलो ऍप कार्ड दिले, याच दरम्यान त्याने तिचा हात पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने तो तिच्या शेजारी बसला आणि पुन्हा लगट करु लागला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. यावेळी बसमध्ये इतर काही प्रवाशी होते. काही वेळानंतर त्याने तिचा मोबाईल घेतला. मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाऊन तिचे फोटो पाहत असताना त्याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. आता हे सर्व कॉमन आहे. चलता है असे म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासंदर्भात अश्लील संभाषण केले होते. वारंवार समजावूनही तो तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
काही वेळानंतर तिचा भुलाभाई देसाई रोड, पारसी हॉस्पिटलचा स्टॉप आला. त्यामुळे तिने बसमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तिचा हात पकडून छातीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने ही माहिती तिच्या मालकाला सांगितली. त्याने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते दोघेही गावदेवी पोलीस ठाण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना तिथे घडलेला प्रकार सांगून आरोपी बसवाहकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या जबानीवरुन ७४, ७५ भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.