टास्कच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
पाचजणांना अटक; अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२४
मुंबई, – पार्टटाईम जॉबची ऑफर देत टास्कवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालणार्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाचजणांना ओरिसा येथून पोलिसांनी अटक केली असून या टोळीने आतापर्यंत ऑनलाईन टास्कद्वारे कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. प्रमोदकुमार रविंद्र बेहरा, राकेशकुमार हरिराम चौधरी, सुर्वेदू निरंकर दास, जयदीप अमरकुमार राऊत आणि मनोजकुमार अदिंचरम राऊत अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी विविध बँक खात्यात फ्रिज करण्यात आलेली सुमारे सात लाखांच्या कॅशसहीत ११ मोबाईल, ४७ विविध बँकेचे पासबुक, २३ बँकांचे चेकबुक, १०४ विविध बँकाचे एटीएम कार्ड, १० सिमकार्ड आणि एक बँक मॅनेजर स्टॅम्प आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने अलीकडेच एका वयोवृद्धाची ४३ लाखांची फसवणुक केली होती.
पश्चिम उपनगरात राहणारे वयोवृद्ध तक्रारदार काही वर्ष आखाती देशात कामाला होता. निवृत्तीनंतर ते भारतात परत आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत एका तरुणीचा फोन आला होता. तिने ती एका खाजगी मार्केटिंग कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागातून बोलत असल्याचे सांगून त्यांना ऑनलाईन टास्कचा पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. तरुण कलाकारांना आणि ब्लॉगर्सना प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करत असल्याचे सांगून त्यांना एक लिंक पाठविली होती. ही कंपनी तरुण कलाकारांना आणि ब्लॉगर्सना प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करत असल्याचे सांगून त्यांना एक लिंक पाठविली होती. टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाईल असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी लिंकमध्ये दिलेले सर्व टास्क पूर्ण केले होते. त्यात त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांचा तिच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर तिने चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून त्यांना काही प्रिपेड टास्क दिले होते. या टास्कमध्ये त्यांना काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यातआले. भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने त्यांनी त्यांना ४३ लाख ६२ हजार ७३१ रुपये भरण्यास प्रवृत्त केले होते. मात्र टास्क पूर्ण करुनही त्यांचा परताव्यासह मूळ रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२ बी भादवीसह ६६ क, ६६ ड आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव, नितीन गच्चे, पोलीस हवालदार प्रशांत भुवड, केशव तकिक, संग्राम जाधव, अभिजीत देसाई यांनी तपास सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातनाच तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी ओरिसा येथून पाचही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांना अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिकांना विनंती आहे की, अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांपासून सावध रहावे, मोबाईल, फोनवरील अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खाते, पासवर्ड, ओटीपी क्रमांक, केवायसी, डेबीट कार्ड क्रमांक, आधारकार्ड, पॅनकार्ड क्रमांक अशी गोपनीय माहिती देऊ नये. अशी कोणीही माहिती मागत असल्यास त्याची जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणतेही मोबाईल ऍप डाऊनलोड करु नये किंवा लिंक क्लिक करु नये. जर आपल्यासोबत सायबर संदर्भात गुन्हा घडल्यास तातडीने सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.