वरळी हिट ऍण्ड रन गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस अटक

आई-बहिणीसह मित्रांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२४
मुंबई, – वरळी हिट ऍण्ड रन गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस अटक करण्यात अखेर वरळी पोलिसांना यश आले आहे. मिहीर राजेश शहा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बुधवारी शिवडीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. वरळीतील अपघातानंतर मिहीर हा पळून गेला होता, त्याला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरुन त्याच्या आईसह दोन बहिणी आणि मित्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरु होती. मिहीरच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

रविवारी वरळी येथे मद्यप्राशन बीएमडब्ल्यू कार चालविताना मिहीरने एका बाईकस्वाराला धडक दिली होती. बाईकवरील महिलेला बोनेटवरुन दिड किलो फरफरत नेऊन नंतर तिच्या अंगावर कार नेली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मिहीरचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश दामजी शहा यांच्यासह त्यांचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनाही सोमवारी शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने राजेश शहाची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर राजेश शहाची पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत मिहीरचा पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे सोळा पथकाची नियुक्ती करुन त्याचा शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना विरारच्या विरार फाटा परिसरातून मंगळवारी मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. तो एका हॉटेलमध्ये त्याच्या मित्रासोबत लपला होता, मात्र ७२ तासानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. सायंकाळी उशिरा मिहीरला अपघातप्रकरणी अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
राजऋषी बिदावतच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ
दुसरीकडे राजेश शहासोबत अटक करण्यात आलेल्या त्याचा चालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत याला सोमवारी शिवडी कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला मंगळवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
जुहूच्या बारवर कारवाई
अपघातापूर्वी मिहीर हा त्याच्या चार मित्रांसोबत जुहूच्या बीस ग्लोबल या बारमध्ये गेला होता. तिथे त्याने त्याच्या मित्रांसोबत मद्यप्राशन केले होते. ही माहिती प्राप्त होताच वरळी पोलिसांनी रविवारीच या बारमध्ये तपासणी केली होती. बारचे सीसीटिव्ही फुटेज आणि डिव्हीआर ताब्यात घेतले होते. या फुटेजमधून मिहीर हा बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत आला होता. बारचे अठरा हजाराचे बिल त्याच्या मित्राने दिले होते. ते बिल त्याने सोशल मिडीयावर अपलोड केले होते. बारमधून बाहेर जाताना तो फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मंगळवारी या बारमध्ये एक्साईज विभागाने कारवाई केली आहे. बारच्या मालकाला नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत बारमध्ये मद्याची खरेदी-विक्री करु नये अशी सक्त ताकिद बारमालकाला देण्यात आली आहे. सुनावणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मित्रामुळेच मिहीर सापडला
वरळीतील अपघातानंतर मिहीरने त्याचे वडिल राजेश शहा यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्याचा मोबाईल बंद करण्यास सांगून त्याला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. या अपघाताच्या वेळेस तो कार चालवत नव्हता तर राजऋषी बिदावत हा कार चालवत असल्याचे सांग असेही त्याने मिहीरला सांगितले होते. त्यानंतर मिहीर वांद्रे येथून रिक्षा पकडून त्याच्या गोरेगाव येथील मैत्रिणीकडे गेला. तिथे त्याने त्याच्या बहिणीला फोन केला. त्यानंतर त्याची बहिण मैत्रिणीकडे आली आणि ते दोघेही बोरिवली आणि नंतर त्याच्या आई, अन्य एक बहिण आणि दोन मित्रांसोबत शहापूरला गेले होते. तिथे त्यांनी एक रिसॉर्ट बुक केला होता. या सर्वांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. दुसर्‍या दिवशी मिहीर हा त्याच्या मित्रासोबत विरार येथील विरार फाटा परिसरात आला. तिथेच तो त्याच्या मित्रासोबत एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. सकाळी त्याच्या मित्राने काही वेळासाठी मोबाईल ऑन केला, त्यामुळे त्याचे लोकेशन पोलिसांना सापडले. क्षणांचा विलंब न करता पोलीस पथक हॉटेलमध्ये गेले आणि तेथून मिहीरसह त्याच्या मित्राला ताब्यात घेतले होते. या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांना अनेक गोष्टींचा उलघडा झाला. त्यानंतर दुसर्‍या टिमने शहापूर येथून मिहीरच्या आईसह दोन्ही बहिणी आणि मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अपघातप्रकरणी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्या आईसह दोन्ही बहिणी आणि मित्रांची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. त्यांची जबानी नोंदविण्यात आली असून या जबानीत त्यांनी गेल्या दोन दिवसांतील सविस्तर माहिती पोलिसांना सांगितली. या सर्वांववर मिहीरला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत मिहीरसह इतर सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page