रेल्वेसह बेस्टमध्ये मोबाईल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

चार रेकॉर्डवरील आरोपींना अटक; चार गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन रेल्वेसह बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरी करणार्‍या एका टोळीचा कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तुकाराम धोंडिबा शिंदे ऊर्फ पिट्या, साजिद इक्रम कुरेशी, मोहम्मद जावेद इक्रम कुरेशी, जमशेद शरीफुद्दीन अन्सारी अशी या चौघांची नावे असून चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्या अटकेने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातील चार मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांनी सांगितले.

प्रतिक साहेबराव भाबड हा नवी मुंबई परिसरात राहत असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २३ फेब्रुवारीला तो बोरिवली येथून भाईंदरला त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठ जात होता. बोरिवलीतील धनश्याम टॉवर येथून तो ७०३ क्रमांकाच्या बसमध्ये चढला होता. यावेळी बसमध्ये गर्दी होती. तिकिट घेण्यासाठी पैसे काढत असताना त्याला त्याचा मोबाईल नसल्याचे दिसून आले. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्याचा मोबाईल चोरी केला होता. त्यामुळे तो कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात आला होता. तिथे त्याला प्रविण चंद्रकांत पाटील नावाचा एक व्यक्ती त्याचा मोबाईल चोरी झाल्याबाबत तक्रार करण्यासाठी आला होता. त्याचा मोबाईलही बसमध्ये प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. या दोघांच्या तक्रारीवरुन कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर १ जुलैला पुन्हा अशाच प्रकारे एका व्यक्तीचा मोबाईल चोरीची तक्रार कस्तुरबा मार्ग पोलिसांना प्राप्त झाली होती. तक्रारदार रोहित रमाकांत गिरकर हे कांदिवलीतून बोरिवलीच्या दिशेने बसमध्ये प्रवास करत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. गेल्या काही दिवसांत बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्याची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज चाळके, पोलीस उपनिरीक्षक वायकोस व अन्य पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस पथक आरोपींची माहिती काढून त्यांचा शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना बोरिवली परिसरात पुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेल्या तुकाराम शिंदे, साजिद कुरेशी, मोहम्मद जावेद आणि जमशेद अन्सारी या चौघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. या चौघांकडून पोलिसांनी चोरीचे सहा मोबाईल जप्त केले. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई व ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. तुकारामविरुद्ध भिवंडी, कासारवडवली, कल्याण, कळवा, मुलुंड, चर्चगेट, बोरिवली, वडाळा, वांद्रे व वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात दहा, साजिदविरुद्ध कासारवडवली, चारकोप पोलीस ठाण्यात दोन, जावेदविरुद्ध आरे, कुरार, दिडोंशी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. यातील तुकाराम हा कळवा तर इतर तिन्ही आरोपी मालाडच्या मालवणी परिसरातील रहिवाशी आहे. त्यांच्या अटकेने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातील चार मोबाईल गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही टोळी मालाड ते दहिसर परिसरात सक्रिय असल्याने त्यांच्या अटकेने इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चोरी करताना दोन आरोपी प्रवाशाला समोरुन अटकाव करतात, तिसरा आरोपी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करुन चौथ्या आरोपीला देत होता. मोबाईल मिळताच तो पळून जात होता अशी या टोळीची गुन्ह्यांची पद्धत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page