झोपमोड होत असल्याने ७८ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची हत्या
ग्रँटरोड येथील घटना; वयोवृद्ध मुलाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुंबई, – झोपमोड होत असल्याने रागाच्या भरात रमाबाई नथू पिसाळ या ७८ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच वयोवृद्ध मुलाने भाजी कापण्याच्या सुर्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रँटरोड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच आरोपी मुलगा सुभाष पुजाजी वाघ (६४) याला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी ९ जुलैला सकाळी सात ते पावणेआठच्या सुमारास ग्रँटरोड येथील लॅमिग्टन रोड, चुनाम लेनच्या पंडितालय इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील रुम क्रमांक अकरामध्ये रमाबाई ही वयोवृद्ध महिला राहत होती. सुभाष हा तिचा मुलगा असून तो काहीच कामधंदा करत नव्हता. सकाळी पाणी येत असल्याने रमाबाई ही पहाटे चार वाजता उठून पाणी भरुन घरातील सर्व काम करत होती. या कामामुळे सुभाष याची नेहमी झोपामोड होत होती. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. मंगळवारी सकाळी रमाबाई ही नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी उठली होती. पाणी भरल्यानंतर तिने घरातील सर्व काम आटपून घेतली. सकाळी सुभाषची पुन्हा झोपमोड झाल्याने त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून रागाच्या भरात त्याने रमाबाई यांच्यावर घरातील भाजी कापण्याच्या सुर्याने वार केले होते. त्यात तिच्या मानेसह छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक रहिवाशांकडून हा प्रकार समजताच डी. बी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
रक्तबंबाळ झालेल्या रमाबाई यांना तातडीने जे. जे मार्ग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वेदाथ विलास वाघ याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सुभाष वाघ याच्याविरुद्ध १०३ (१) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सुभाष वाघ याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात रमाबाई पिसाळ हिच्या पतीने दोन लग्न केले असून दोन्ही पत्नींना प्रत्येकी चार मुले होते. तिने तिच्या घराचे दोन भाग केले असून एका भागात तिचे मुले त्यांच्या कुटुंबियांसोबत तर दुसर्या भागात ती सुभाषसोबत राहत होती. सुभाष हा सातारा येथे राहत होता. फेब्रुवारी महिन्यांत तो तिच्यासोबत राहण्यासाठी मुंबईत आला होता. रात्रीच्या वेळेस झोपमोड होत असल्याने सुभाषने त्याची वयोवृद्ध आई रमाबाई हिची सुर्याने वार करुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्यांतील सुरा पोलिसांनी हस्तगत केला आहे.