वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणी मिहीर शहाला १६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी
भरवेगात कार चालविण्याचा प्रयत्न केला; मात्र मद्यप्राशन केले नव्हते
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुंबई, – वरळी हिट ऍण्ड रनच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने पळून गेलेल्या आणि दोन दिवसांनी विरार येथील विरार फाट्याजवळील एका हॉटेलमधून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याला बुधवारी दुपारी शिवडीतील लोकल कोर्टात कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने मिहीरच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली तर मिहीरच्या वकिलांनी अपघाताचा तपास जवळपास पूर्ण झाला असून मिहीरच्या पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी एस. पी भोसले यांनी मिहीर शहाला मंगळवार १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
रविवारी वरळी येथे मिहीर चालवत असलेल्या बीएमडबल्यू कारने एका बाईकला जोरात धडक दिली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचे पती प्रदीप लिलाधर नाखवा हे किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर मिहीर हा त्याचा कारचालक राजऋषी बिदावत याच्यासोबत पळून गेला होता. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात मद्यप्राशन करुन हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर तिच्या पतीला दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच मिहीरचे वडिल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश दामजी शहा यांच्यासह त्यांचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनाही सोमवारी शिवडीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी राजेश शहा यांची पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती तर राजऋषीला गुरुवार ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अपघातानंतर मुख्य आरोपी मिहीर शहा हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे सोळा पथकाची नियुक्ती करुन त्याचा शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना विरारच्या विरार फाटा परिसरातून मंगळवारी मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत मिहीरने भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची कबुली दिली. मात्र अपघाताच्या वेळेस त्याने मद्यप्राशन केले नव्हते असा दावा केला.
मंगळवारी सायंकाळी अटक केल्यानंतर मिहीरला बुधवारी दुपारी शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. अपघातानंतर आरोपीला पळून जाण्यास कोणी मदत केली का, त्याने मद्यप्राशन केल्याचे काही पुरावे सापडले आहे, त्याची शहानिशा करणे बाकी आहे. मिहीरने त्याचा मोबाईल नष्ट केला असून तो मोबाईल हस्तगत करणे बाकी आहे. अपघातानंतर कारचा नंबर प्लेट बदलण्यात आले होते, ती नंबर प्लेट हस्तगत करणे बाकी आहे, त्याचा कारचालक राजऋषीसोबत त्याची समोरासमोर चौकशी करायची आहे, मिहीरकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का, असेल तर तो परवाना रद्द करायचा आहे असे कोर्टात सांगून त्याच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली होती. तर मिहीरच्या वकिलांनी त्याची पोलिसांनी मंगळवारी दिवसभर चौकशी केली आहे, गुन्ह्यांत जे कलम लावले आहे, त्यात पोलीस कोठडीची गरज नाही. गुन्ह्यांची सर्व माहिती आणि पुरावे पोलिसांकडे आहे, आरोपीकडून कुठल्याही पुराव्याची छेडछाड करणार नाही. त्यामुळे आता त्याच्या चौकशी गरज नसल्याचे सांगून त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. दोन्ही युक्तिवाद महानगर दंडाधिकारी एस. पी भोसले यांनी ऐकल्यानंतर त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केस-दाढी कापून काहीच फायदा झाला नाही
अपघातानंतर वडिलांच्या आदेशानंतर मिहीर हा पळून गेला होता. त्यापूर्वी त्याने स्वतचा मोबाईल स्विच ऑफ केला होता. स्वतची अटक टाळण्यासाठी मिहीरकडून बरेच प्रयत्न झाले. इतकेच नव्हे तर स्वतची ओळख लपविण्यासाठी त्याने केस कापले, सेव्हींग केले होते. आपल्याला कोणीही ओळखू नये तसेच पकडले जाऊ नये म्हणून मिहीरकडून पुरेपुरे काळजी घेतली जात होती. त्यामुळे तो शहापूर येथे आई-बहिणीसोबत जास्त वेळ थांबला नाही. तेथून तो त्याच्या मित्रांसोबत निघून गेला. शहापूरहून निघाल्यानंतर ते दोघेही विरार फाट्याजवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईल बंद ठेवला होता. मात्र मित्राने कॉल करण्यासाठी फोन चालू केला आणि त्यांचे लोकेशन पोलिसांना सापडले. त्यानंतर अवघ्या काही तासांत मिहीर शहासह त्याच्या मित्राला हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईतून पळून गेल्यानंतर मिहीरने नाशिक, इगतपुरी, गणेशपुरी, शहापूर आणि नंतर विरार असा प्रवास केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रवासादरम्यान त्याने त्याचा मोबाईल लपवून ठेवला होता. या मोबाईलचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे त्याची आई आणि बहिणी ठाणे, मुरबाडमार्गे शहापूरला पोहचले होते.
आई-बहिणीसह मित्रांचे बारा मोबाईल जप्त
विरार येथून मिहीरसह त्याच्या मित्राला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून त्याच्या आई-बहिणीसह मित्रांचा ठावठिकाणा पोलिसांना समजला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या दुसर्या पथकाने शहापूर येथील रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असलेल्या त्याच्या आई-दोन बहिणीसह मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या सर्वांना नंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून पोलिसांकडून बारा मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलमधील काही डाटा त्यांनी डिलीट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे हा डाटा परत मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. त्यांचे मोबाईल लवकरच फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले जाणार आहे. या सर्वांवर मिहीरला पळून जाण्यास मदत केल्याचा तसेच त्याचा ठावठिकाणा माहित असताना पोलिसांपासून ही माहिती लपवून ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावरही लवकरच कायदेशीर कारवाई होणार असल्याचे बोलले जाते.
जुहूच्या बारचे पेमेंट मिहीरकडूनच
शनिवारी रात्री मिहीर हा त्याच्या तीन मित्रांसोबत जुहू येथे आला होता. त्यानंतर ते चौघेही जुहूच्या बिस ग्लोबल बारमध्ये आले होते. त्यापूर्वी त्याच्या मित्राने रात्री नऊ वाजता एक टेबल बुक केला होता. रात्री उशिरापर्यंत त्यांनी तिथे मद्यप्राशन केले होते. त्याचे अठरा हजार रुपये बिल झाले होते. ते बिल मिहीरने क्रेडिट कार्डवरुन पेड केले होते. ते बिल नंतर त्याने सोशल मिडीयावर अपलोड केले होते. या पार्टीत मिहीरसोबत त्याचे तिन्ही मित्र होते, या तिघांनाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या जबानीत ही माहिती उघड झाली आहे. बारच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन मिहीर व त्याचे मित्र रात्री साडेअकरा वाजता बारमध्ये आले होते. बार मालकाने नियमांचे उल्लघंन केल्याचे उघडकीस आल्याने त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे. बारमध्ये २१ वर्षांखालील तरुणांना मद्य विक्री करु नये अशा सूचना दिल्या आहेत. तरीही त्यांना मद्य विक्री करण्यात आले होते. मुंबई उपनगरात नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी गेल्या सात महिन्यांत ४५० बारवर राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे.