मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
ठाणे, – काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यांत आरोपी न करण्यासाठी सात लाखाची लाचेची मागणी करुन पाच लाख रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुचित निवृत्ती टिकेकर याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने लवकरच सुचित टिकेकर याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
यातील तक्रारदार ठाण्यातील रहिवाशी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मित्राच्या मेहुण्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांत त्यांच्या मित्राला आरोपी करण्यात आले होते. यासंदर्भात त्याने पोलीस हवालदार सुचित टिकेकर याची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्याने त्याला आरोपी न करण्यासाठी सात लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्याला पाच लाख रुपये देण्याची दर्शविली होती. या रक्कमेची लवकरात लवकरात व्यवस्था करतो असे सांगून तक्रारदाराने पोलीस हवालदार सुचित टिकेकर याच्याविरुद्ध ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची बुधवार ३ जुलैला संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी पोलीस हवालदार सुचित टिकेकर याने तक्रारदाराच्या मित्राला आरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. हा प्रकार उघडकीस येताच बुधवारी १० जुलैला त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्याने ही लाच कोणासाठी मागितली होती, त्यासाठी त्याला कोणी प्रवृत्त केले होते का याची चौकशी होणार आहे. या चौकशीतून उघडकीस आलेल्या माहितीनंतर संबंधित दोषीवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.