मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ जुलै २०२४
मुंबई, – घरी कोणीही नसल्याची संधी साधून वडिलांच्या मित्रानेच एका अकरा वर्षांच्या मुलीशी अश्लील संभाषण करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ५३ वर्षांच्या आरोपी मित्राला पंतनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३० वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर परिसरात राहत असून तिला अकरा वर्षांची मुलगी आहे. आरोपी हा याच परिसरात राहत असून तिच्या पतीचा मित्र आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता तिची मुलगी एकटीच घरात होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिला त्याचे तिच्यावर दिड वर्षांपासून प्रेम असल्याचे सांगून तिच्याशी अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिचा हात पकडून तिला स्वतजवळ ओढण्याचा प्रयत्न केला होता. तिने त्याला होकार दिला नाहीतर तो जीव देईल अशी धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. या घटनेनंतर तो तेथून पळून गेला होता. काही वेळानंतर तक्रारदार महिला घरी आली असता तिच्या मुलीने घडलेला प्रकार तिला सांगितला. त्यानंतर तिने तिच्या मुलीला पंतनगर पोलीस ठाण्यात आणले. घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून तिने पतीच्या आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ७४, ३५१ (१) भारतीय न्याय संहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ५३ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.