पाच लाखांचे कर्ज देतो सांगून कागदपत्रे घेऊन फ्लॅटची विक्री
बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ जुलै २०२४
मुंबई, – पाच लाखांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून कागदपत्रे घेऊन फ्लॅटची सुमारे सव्वाकोटी रुपयांमध्ये परस्पर विक्री करुन एका टोळीने ७१ वर्षांच्या महिलेची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकणी बोरिवली पोलिसांनी कट रचून बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात धवल भरत सिरीया, रेखा भरत सिरीया, साहिराबानू जुल्फीकार, रफिक मोहम्मद सय्यद, एस. एस टेडर्संच्या समीना, मोहम्मद सिद्धीकी रेहमान, हेमंत वसंतराय मेहता, अमीत यादव आणि वसंतराय मेहता यांचा समावेश आहे.
कल्पना आश्विन शहा ही वयोवृद्ध महिला बोरिवलीतील चिकूवाडी, शिपोंली रोडच्या सोनी पार्क अपार्टमेंटमध्ये राहत असून हा फ्लॅट पतीच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर झाला होता. तिच्या सूनेला पाच लाख रुपयांचे कर्ज हवे होते. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिच्या मैत्रिणीने तिची सलीम ऊर्फ मोहम्मद सादिकूर याच्याशी ओळख करुन दिली. त्याने तिला एका सहकारी पतपेढीतून पाच लाखांचे कर्ज देतो असे सांगून त्यांच्या फ्लॅटचे कागदपत्रे घेतले होते. काही दिवसांनी त्याने तिला पाच लाखांचे कर्ज मिळवून दिले होते, ही रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रॉन्स्फर करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत तिने बँकेचे नियमित हप्ते भरले होते. काही दिवसांनी तिने संबंधित सहकारी पतपेढीतून तिचे बँक स्टेटमेंेटची पाहणी केली होती. त्यात धवल सिरीया, रेखा सिरीया, साहिराबानू, रफिक सय्यद, समीना, मोहम्मद सिद्धीकी, हेमंत मेहता, अमीत आणि वसंतराय मेहता यांच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. त्यापैकी ती कोणालाही ओळखत नव्हती. तरीही तिच्या बँक खात्यातून लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे कल्पना शहाचा मुलगा अमीत शहा याने बोरिवलीतील रजिस्ट्रेशन कार्यालयातून सर्च रिपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला त्याची आई कल्पना शहा हिच्या नावावर असलेला फ्लॅट हेमंत मेहता याला विक्री झाल्याचे दिसून आले. या फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा सव्वाकोटी रुपयांमध्ये झाला होता, त्यापैकी ८५ लाखांचे पेमेंट त्यांना देण्यात आले होते.
अशा प्रकारे या टोळीने पाच लाख रुपयांचे कर्ज देतो असे सांगून त्यांच्याकडून त्यांच्या फ्लॅटचे कागदपत्रे घेतले. या फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून कल्पना शहा यांना अंधारात ठेवून फ्लॅटचा सव्वाकोटी रुपयांना खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच कल्पना शहा हिने बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धवल सिरीया, रेखा सिरीया, साहिराबानू, रफिक सय्यद, समीना, मोहम्मद सिद्धीकी, हेमंत मेहता, अमीत आणि वसंतराय मेहता यांच्याविरुद्ध पोसिंानी १२० बी, ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांतील सर्व आरोपी पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.