लग्नाच्या आमिषाने ४२ वर्षांच्या महिलेवर लैगिंक अत्याचार
काळबादेवीतील घटना; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ जुलै २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका ४२ वर्षांच्या महिलेवर लैगिंक अत्याचार करुन तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात घडला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रार अर्जावरुन तिचा प्रियकर अकेंश धनसुखलाल गोहिल (४७) याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
४२ वर्षांची तक्रारदार महिला ही मुंब्रा येथे राहत असून ती एका ब्युटी पार्लरमध्ये कामाला आहे. सतरा वर्षांपूर्वी तिची अंकेशशी ओळख झाली होती. तो काळबादेवी येथील जुनी हनुमान गल्ली, शांतीभवनचा रहिवाशी आहे. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही दिवसांनी त्याने तिला प्रपोज केले होते, तिनेही त्यास होकार दिला होता. जुलै २००७ रोजी त्याने तिला ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये नेले होते. तिथेच त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. आपण लवकरच लग्न करु असे सांगून त्याने गेल्या सतरा वर्षांत अनेकदा तिच्यावर तिच्या राहत्या घरासह चिराबाजार येथील लॉजमध्ये लैगिंक अत्याचार केला होता. विविध कारण सांगून तिच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. पैशांची मागणी केल्यानंतर तो तिला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. लग्नाविषयी विचारणा केल्यानंतर तो तिच्याशी वाद घालत होता.
अंकेशने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने अलीकडेच एल. टी मार्ग पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन अंकेशविरुद्ध पोलिसांनी ३७६, ४०६, ४२०, ३२३, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली नाही. लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होईल आणि नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.