व्यावसायिकाला ६५ लाखांना गंडा घालणारे त्रिकुट गजाआड
ड्रग्जसह मनी लॉड्रिंगप्रकरणी कारवाईची धमकी देऊन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ जुलै २०२४
मुंबई, – तैवान येथे पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये बोगस पासपोर्टसह ड्रग्ज असल्याचा आरोप करुन बोगस कागदपत्रांच्या आधारे विविध बँकेत खाते उघडून त्यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करुन मनी लॉड्रिंग केल्याप्रकरणी कारवाईची धमकी देत एका व्यावसायिकाची सुमारे ६५ लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घालणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून या तिघांनी या कटातील मुख्य सायबर ठगांना विविध बँकेत खाते उघडून फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटक आरोपींमध्ये शुभम सुधीर पाडावे, फयान अक्रम शेख ऊर्फ मिलू आणि अदनान हुसैन मुस्तफा मिर्झा यांचा समावेश असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत पार्सलमधून विदेशात ड्रग्ज पाठविल्याचा आरोप करुन कारवाईची धमकी देऊन ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. अशा आरोपीविरुद्ध कारवाई सुरु असतानाच कांदिवलीतील एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ६५ लाखांची फसवणुक केली होती. काही दिवसांपूर्वी या व्यावसायिकाला फेडेक्स पार्सलसंबंधी एक कॉल आला होता. त्यांच्या नावाने तैवान येथे एक पार्सल पाठविण्यात आले असून त्यात पाच पासपोर्ट, चार क्रेडिट कार्ड, एक लॅपटॉप, दोनशे ग्रॅम एमडी आणि चार किलो कपडे होते. ते पार्सल सायबर सेल पोलिसांनी जप्त केले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्यांची चौकशी सुरु केली होती. त्यांनी विदेशात कुरिअर पाठविण्यासाठी बोगस आधारकार्डसह इतर कागदपत्रांचा वापर केला असून या आधारकार्ड आणि पॅनकार्डवरुन विविध बँकेत खाते उघडण्यात आले होते, या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहे. हा मनी लॉड्रिंगचा प्रकार असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाईची भिती दाखविणयात आली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकार्याचे बोगस ओळखपत्र आणि आरबीआयचे पत्र पाठविण्यात आले होते.
या गुन्ह्यांत अटक झाल्यास त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते असे सांगून त्याने त्यांना त्यांच्या बँकेची माहिती जाणून घ्यायची आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांना विविध बँक खात्यात ६५ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. चौकशीनंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रास्फर केली जाणार आहे असेही सांगितले. त्यामुळे त्यांनी ती रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम परत पाठविण्यात आली नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु करुन शुभमला बोरिवली तर फयान आणि अदनान या दोघांनाही मालाड परिसरातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी साडेतेरा लाखांची कॅश फ्रिज केली असून आरोपींकडून चार मोबाईल, अकरा बँकाचे पासबुक, चौदा विविध बँकांचे एटीएम, तीन मोबाईल सिमकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. फसवणुकीची ही रक्कम शुभमच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याने काही रक्कम चेकद्वारे फयानला आणि फयानने अदनानला दिली होती. अदनानने क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून काही रक्कम त्याच्या मुख्य सहकार्यांना पाठविल्याचे तपासात उघडकीस आले. या गुन्ह्यांत तिघांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कदम, पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे, पोलीस हवालदार नितीन मोरे, किरण वसईकर, हबीब सय्यद यांनी केली.