दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी नितेश राणे यांना समन्स
यापूर्वी केलेल्या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ जुलै २०२४
मुंबई, – मद्यप्राशन करुन मानसिक नैराश्यातून इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केलेल्या दिशा सतीश सालियन प्रकरणात भाजपाचे आमदार नितेश नारायण राणे यांना विशेष तपास अधिकार्यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली आहे. याबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा करणार्या नितेश राणे यांना विशेष तपास अधिकार्यांनी चौकशीसाठी येताना केलेल्या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मालाड येथील मालवणी, जनकल्याण नगरात गॅलक्सी नावाची एक इमारत असून या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर रोहन रॉय हा राहतो. दिशा ही त्याची प्रेयसी असून ८ जून २०२० रोजी तिच्यासह इतर चार मित्र रोहनच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्या घरी पार्टी झाली होती. रात्री उशिरा दिशा ही बाराव्या मजल्यावरुन पडली होती, ही माहिती समजताच तिला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते, प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे रोहन रॉयसह इतर चार मित्र दिप अजमेरा, इंद्रनील वैद्य, रिशा पडवळ, हिमांशू शिखरे तसेच दिशाची आई वासंती आणि वडिल सतीश सालियन यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती, या जबानीत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. तसेच दिशाच्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरले नव्हते. त्यामुळे मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. हा तपास सुरु असतानाच दिशा सालियन आत्महत्येप्रकरणी काही सोशल मिडीया, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्याद्वारे विविध बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे मालवणी पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही काहीही तक्रार, पुरावे सादर करायचे आहे, किंवा पोलिसांना काही महत्त्वाची माहिती सांगायची असेल तर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या आवाहनानंतर कोणी पुढे आले नव्हते किंवा कोणी पुरावे सादर केले नव्हते. दिशाच्या आत्महत्येनंतर सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली होती.
या दोन्ही आत्महत्या एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला होता. या दोघांच्या आत्महत्या नसून त्यांची हत्या झाली असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. याबाबत त्यांच्याकडे भक्कम पुरावे आहेत. योग्य वेळेस आपण ते पुरावे सादर करुन नितेश राणे यांनी शिवसेनेचे युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केले होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी तपास अधिकार्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात नारायण राणे यांची चौकशी करण्यात आली होती. दिशावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती असेही नितेश राणे यांनी सांगितले होते. त्यामुळे नितेश राणे यांना विशेष तपास अधिकार्यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. तसेच त्यांना त्यांच्याकडील असलेले पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे नितेश राणे काय जबानी देतात, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे दिशाविरुद्ध चुकीची आणि बदनामीकारक वृत्त देणार्या संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी तिचे वडिल सतीश सालियन यांनी केली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.