नोकरीसाठी मुंबईत बोलावून बँक खात्यातून ३८ लाखांचा डल्ला
साकिनाका येथील घटना; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२४
मुंबई, – विदेशात नोकरीच्या आमिषाने मुंबईत बोलाविण्यात आलेल्या तीन तरुणांचे मोबाईलसह लॅपटॉप चोरी करुन त्यांच्या बँक खात्यातून सुमारे ३८ लाख रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी हरजीत सिंग आणि मोहीत चढ्ढा या भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सिमरनजीत कुलदीप सिंग हा २३ वर्षांचा तरुण पंजाबच्या लुधियानाचा रहिवाशी आहे. तो त्याच्या गावातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याला लहानपणापासून कॅनडामध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. याबाबत त्याने त्याच्या वडिलांच्या बहिणीच्या पतीला ही माहिती सांगितली होती. जून महिनंत त्यांची हरजीत सिंगशी ओळख झाली होती. तो कॅनडामध्ये इच्छुक असलेल्या तरुणांना नोकरीचे काम करत होता. त्यामुळे त्यांनी त्याला सिमरनजीत सिंग याच्याशी सांगितले होते. यावेळी हरजीतने त्यांना कॅनडामध्ये विविध खाजगी कंपनीत नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून सिमरनजीतला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने त्यांना मुलाखतीसाठी दिल्लीत येण्यास सांगितले. त्यामुळे सिमरनजीत हा तिथे गेला होता. तिथे त्याची पंजाबच्या नवदीप सिंग आणि हिमाचल प्रदेशच्या आदर्शकुमार या दोघांशी ओळख झाली होती. या दोघांनाही हरजीतने मुलाखतीसाठी बोलाविले होते. यावेळी हरजीतने त्याच्या कंपनीचे मालक मोहीत चढ्ढा यांच्याशी त्यांची ओळख करुन दिली. कॅनडाच्या व्हिसाचे काम तेच करणार होते असे या तिघांना सांगण्यात आले होते.
३० जूनला ते तिघेही दिल्लीहून दुरांतो एक्सप्रेसने मुंबईत आले होते. यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था हरजीतने साकिनाका येथील हॉटेल शाही पॅलेसमध्ये केली होती. तिथे त्यांना प्रोसेसिंगसाठी किमान दोन ते तीन दिवस लागतील असे सांगितले. २ जुलैला ते तिघेही हॉटेलमध्ये झोपले होते. रात्री अकरा वाजता त्यांना जाग आली असता त्यांना त्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर सामान जागेवर नव्हते. त्यामुळे त्यांनी हरजीतला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता. त्यांच्याकडे हॉटेलचे बिल देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे सिमरनजीत हा दुसर्या दिवशी त्याच्या बँकेत गेला होता. यावेळी त्याच्या बँक खात्यातून सहा लाख सात हजार रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे उघडकीसआले. अशा प्रकारे नवदीप सिंगच्या बँक खात्यातून २५ लाख ६९ हजार आणि आदर्शकुमार याच्या बँक खात्यातून सहा लाख एकवीस हजार रुपये काढण्यात आले होते. नोकरीसाठी मुंबईत बोलावून, साकिनाका येथील हॉटेलमध्ये झोपले असताना हरजीतने त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करुन त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन सुमारे ३७ लाख ९७ हजार रुपये काढून या तिघांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच या तिघांनी घडलेला प्रकार साकिनाका पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी हरजीत सिंग आणि मोहीत चढ्ढा या दोघांविरुद्ध ३१९ (२), ३१८ (४), ३०५, ३ (५) भारतीय न्यास संहिता सहकलम ६६ (डी), ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.