मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२४
मुंबई, – मे महिन्यांत झालेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध विशेष तपास पथकाने शुक्रवारी लोकल कोर्टात आरोपपत्र सादर केले आहे. ३२९९ पानाच्या या आरोपपत्रात १०२ साक्षीदार असून त्यांच्या जबानीसह व्हीजेटीआयचा अहवाल आरोपपत्रात सादर करण्यात आला आहे. भावेश प्रभूदास भिडे, मनोज रामकृष्ण संगू, सागर कुंडलिक कुंभारे, जान्हवी नयन मराठे ऊर्फ जान्हवी केतन सोनलकर अशी या चौघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध ३०४ (२), ३३८, ३३७, ४२७, ३४, १२० (ब) भादवी कलमांतर्गत आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे सीआरपीसी कलम १७३ अ नुसार हा तपास सुरुच राहणार आहे. या तपासात नवीन काही पुरावे सापडल्यास पुरवणी आरोपपत्र सादर केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
१३ मे २०२४ रोजी मुंबई शहरात अचानक वादळी वारे वाहून जोराचा पाऊस सुरु झाला होता. यावेळी पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक जाहिरात होर्डिंग कोसळून पेट्रोलपंपावर पडले होते. या दुर्घटनेत सतराजणांना जीव गमवावा लागला होता तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते. या होर्डिंग दुर्घटनेची गृहविभागाने गंभीर दखल घेत विशेष तपास पथकाची नियुक्ती करुन तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी आणि युगो कंपनीचा मालक भावेश भिडे याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पथकाने १७ मेला भावेश भिडे, ३० मेला होर्डिंगला स्ट्रक्चल रिपोर्ट देणारा मनोज संगू आणि ९ जूनला कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे आणि कॉन्ट्रक्टर सागर कुंभारे यांना गोवा येथून अटक केली होती. जान्हवीने अटक टाळण्यासाठी विशेष सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र तिची याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर ती मुंबईतून पळून गेली होती. अखेर तिच्यासह सागरला पोलिसांनी गोवा येथून अटक केली. या चारपैकी भावेश भिंडे याच्याकडून पाच मोबाईल, सहा सिमकार्ड, एक पॅनकार्ड, रेल्वे तिकिट, होर्डिंगसंदर्भाताल काही महत्त्वाचे दस्तावेज, मनोज संगू याच्याकडून एक मोबाईल, मूळ स्ट्रक्चरल परवाना, जान्हवी मराठे हिच्याकडून एक मोबाईल, विविध नावाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड तसेच आरसी बुक तर सागर कुंभार याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल फोन, २९ हजार ५०० रुपयांची कॅश, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला होता.
तपासात मनोजने बीपीसीएल पेट्रोलपंपाचे ३३८०० स्न्वेअर फुट होर्डिंगच्या बांधकामाची सदोष डिझाईन बनविली होती. तसेच त्याने केलेल्या बांधकामावर देखरेख न करता ते होर्डिंग मजबूत असल्याचा स्ट्रक्चरल स्टॅबबिलिटी रिपोर्ट दिला होता. भावेश भिंडे आणि जान्हवी मराठे यांनीच त्याला ते काम दिले होते. जास्त पैसे कमविण्याच्या उद्देशाने कोणतीही काळजी न घेता सदोष डिझाईन बनविल्याने ते होर्डिंग कोसळले होते. त्यात सागर कुंभारची महत्त्वाची भूमिका होती. त्यानेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने ते होर्डिंग कोसळले होते. चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने विशेष पथकाने शुक्रवारी दुपारी चारही आरोपींविरुद्ध ३२९९ पानांचे आरोपपत्र लोकल कोर्टात सादर केले होते. या आरोपपत्रात १०२ साक्षीदाराची जबानी नोंदविण्यात आली असून ही जबानी आरोपपत्रासोबत जोडण्यात आली आहे. त्यात महानगरपालिकेचे दोन कर्मचारी, रेल्वेचे सहा अधिकारी आणि कर्मचारी, पाच मेसन आणि आरएमसी पुरवठादार आणि ९० जखमीसह मृतांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. आरोपपत्रात पोलिसांनी व्हीजेटीआयचा अहवाल जोडला आहे. गुन्ह्यांचा तपास किचकट असल्याने तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे सीआरपीसी कलम १७३ अ नुसार पोलिसांचा तपास पुढे चालू राहणार असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले. ६० दिवसांत आरोपपत्र सादर करणे पोलिसांना बंधनकारक होते, मात्र पोलिसांनी ५७ व्या दिवशी आरोपपत्र सादर केले आहे.