सुरक्षा बेठकीला उपस्थित असलेल्या लष्काराच्या जवानाला अटक
यापूर्वी पंतप्रधानाच्या सभेत बोगस कार्ड वापरुन प्रवेश केला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२४
मुंबई, – शनिवारी होणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांकाच्या सुरक्षा बैठकाला अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी लष्काराच्या एका जवानाला वनराई पोलिसांनी अटक केली. रामेश्वरप्रसाद दयाशंकर मिश्रा असे या जवानाचे नाव अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या वर्षी वांद्रे येथील बीकेसी परिसरात नरेंद्र मोदी यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती, तिथेही रामेश्वरप्रसाद हा बोगस आय कार्ड घेऊन व्हीव्हीआयपी परिसरात आला होता, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध लष्कराकडून कोर्ट मार्शलची कारवाई सुरु करण्यात आली आहे. बीकेसी सभेसह गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा बैठकीला तो कशासाठी आला होता याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत रामेश्वरप्रसादची कसून चौकशी करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
शनिवारी नरेंद्र मोदी हे मुंबई दौर्यावर येत आहे. त्यांच्या हस्ते विविध लोकार्पणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोरेगाव येथील नेस्को येथे त्यांचा एक कार्यक्रम आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एक सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यात एनएसजी स्पेशन प्रोटेक्शन युनिट, बीडीडीएस, मुंबई पोलीस प्रोटेक्शन युनिट, पंतप्रधान यांच्या सुरक्षेसंबंधित विविध युनिट आदींचा समावेश होता. ही बैठक एसपीजी महासंचालकाच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली होती. सकाळी साडेदहा वाजता बैठक सुरु झाली आणि दुपारी साडेबारा वाजता संपली होती. यावेळी तिथे एक अज्ञात व्यक्ती अधिकारी असल्याचे सांगून वावरत होता. त्याची हालचाल संशयास्पद होती. हा प्रकार मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागाच्या एका अधिकार्याच्या निदर्शनास आली. त्यामुळे या अधिकार्याने त्याला थांबण्याचा इशारा केला होता, मात्र तो तेथून पळून गेला. तो एका रिक्षातून गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याच्या अटकेसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून रामेश्वरप्रसाद मिश्रा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत तोच बैठकीत उपस्थित असल्याचे उघडकीस आले. तो लष्करात जवान म्हणून कामाला होता. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांची वांद्रे येथील बीकेसीमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. तिथेही तो व्हीव्हीआयपी परिसरात वावरत होता. त्याच्याकडे असलेले आय कार्डही बोगस होते. ही माहिती नंतर लष्काराच्या प्रमुखांना देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्ट मार्शलची कारवाई सुरु करण्यात आली होती. ही कारवाई सुरु असताना तो गोरेगाव येथील सुरक्षा बैठकीला हजर होता. यामागे त्याचा काय उद्देश होता, त्याला तसे करण्यास कोणी प्रवृत्त केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान रामेश्वरप्रसाद मिश्राविरुद्ध वनराई पोलिसांनी २०४, २०५, २३६, ३३८ (२), ३४० भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची चौकशी करुन चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश वनराई पोलिसांना देण्यात आले आहे.