बोगस दस्तावेज बनवून संक्रमण शिबीरातील रुमची खरेदी-विक्री
सतरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपी महिलेस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – तात्पुरता राहण्यासाठी दिलेल्या म्हाडा संक्रमण शिबीरातील रुमचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका महिलेची सतरा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपी महिलेस पाच महिन्यानंतर समतानगर पोलिसांनी अटक केली. स्नेहा रामचंद्र वेरणेकर असे या महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत समीर राऊत आणि संतोष पाटील हे दोघेही सहआरोपी आहेत.
स्नेहा ही गुन्ह्यांतील मुख्य आरोपी असून तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. सिमा दिनेश वाईरकर ही महिला सिंधुदुर्गच्या मालवण, कोळावाडी-फणसवाडीची रहिवाशी आहे. २०१८ साली तिचा दिर उमेश प्रभाकर गोलतकर याने कांदिवलीतील अशोकनगर, मोरारजी मिल संक्रमण शिबीरात एक रुम खरेदी केली होती. तिला गुंतवणुक म्हणून त्याच इमारतीमध्ये एक रुम खरेदी करायचा होता. त्यामुळे तिने तिच्या दिराला याबाबत माहिती दिली होती. काही दिवसांनी उमेशने तिची संतोषसह स्नेहासोबत तिची ओळख करुन दिली होती. या ओळखीदरम्यान स्नेहा ही तिथे एजंट म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले. तिने उमेशच्या इमारतीमध्ये म्हाडाचा एक रुम असल्याचे सांगून तिला तो रुम अठरा लाखांमध्ये देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे सीमा ही तिच्या पतीसोबत रुम पाहण्यासाठी मुंबईत आली होती. रुम बघिल्यानंतर त्यांनी तो रुम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी स्नेहाने तिला तो रुम म्हाडाने तात्पुरता राहण्यासाठी दिला असून नंतर म्हाडाकडून कागदपत्रे प्राप्त करुन तिच्या नावावर रुम करण्याचे मान्य केले होते.
एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत तिने स्नेहाला टप्याटप्याने १७ लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात रुम खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. मात्र तिने रुमचा ताबा दिला नव्हता. या रुमची म्हाडा कार्यालयात सुनावणी सुरु आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तिला रुमचा ताबा देण्याचे मान्य केले होते. काही दिवसांनी सिमा ही तिच्या पतीसोबत म्हाडा कार्यालयात सुनावणीसाठी गेली होती. यावेळी तिला म्हाडाचा तो रुम संक्रमण शिबीरातील रहिवांशाना तात्पुरता राहण्यासाठी देण्यात आला असून या रुमचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येत नाही. त्यामुळे तिने स्नेहाने दिलेल्या कागदपत्रांची शहानिशा केली होती. यावेळी ते सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले.
म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील रुम स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून स्नेहासह इतर दोघांनी तिच्यासोबत रुमचा खरेदी-विक्रीचा करार करुन तिची सतरा लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच सिमा वाईरकर हिने तिन्ही आरोपीविरुद्ध समतानगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्नेहा वेरणेकर, समीर राऊत, संतोष पाटील यांच्याविरुद्ध ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३५ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत स्नेहा ही फरार होती, अखेर तिला पाच महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.