घातक शस्त्रांच्या धाकावर ज्वेलर्स दुकानात ४० लाखांचा दरोडा

सतरा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
नालासोपारा, – घातक शस्त्रांचा धाक दाखवून ज्वेलर्स मालकाला मारहाण करुन दुकानातून सुमारे ४० लाखांचा दरोडा घालून पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस सतरा वर्षांनी गजाआड करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. जनार्दन ऊर्फ जॉनी रामराव वाघमारे असे या ४३ वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले. जॉनी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तेराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांनी सांगितले.

मुकेश नामालाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे नालासोपारा येथील तुर्ळीज रोड, टोपाझ शॉपिंग सेंटरमध्ये सरगम गोल्ड नावाचे एक ज्वेलर्स दुकान आहे. २४ फेब्रुवारी २००८ रोजी मुकेश जैन हे नेहमीप्रमाणे दुकानात होते. यावेळी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानात दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला होता. चॉपरसह रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मुकेश जैन यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करुन दुकानाच्या केबीनमध्ये बांधून ठेवण्यात आले होते. त्यानंतर या व्यक्तींनी दुकातील सुमारे ४० लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. स्वतची सुटका करुन मुकेश जैन यांनी घडलेला प्रकार नालासोपारा पोलिसांना सांगितला होता. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३९५, ३९७, ३४२, ३४ भादवीसह ३, २५ घातक शस्त्र कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वसंत चांगदेव म्हात्रे, बायणबाई रामराव वाघमारे, कुसूम दिलीप कोरडे, इंदूबाई दत्तराव लोंबणे, दिपक जगदीश रोडा या पाच आरोपींना अटक केली होती. या पाचही आरोपीविरुद्ध नंतर विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या आरोपपत्रात जॉनी ऊर्फ जर्नादन वाघमारे याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. मात्र तो गेल्या सतरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता.

ही शोधमोहीम सुरु असतानाच जॉनी हा त्याच्या नांदेडच्या हिंगोली, भांडेगावात वास्व्यास असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक हितेंद्र विचारे, पोलीस हवालदार राजाराम काळे, हनुमंत सूर्यवंशी, पोलीस शिपाई अकिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड आदीचे एक पथक नांदेडला गेले होते. या पथकाने जॉनीची माहिती काढून त्याला त्याच्या राहत्या गावाहून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत दरोड्यातील गुन्ह्यांतील तोच मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले. अटकेच्या भीतीने जॉनी हा गेल्या सतरा वर्षांपासून तिथे वास्तव्यास होता, सतत वास्तव्याची जागा बदलत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसाठी आव्हान होते, अखेर प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे व अन्य पोलीस पथकाने त्याला गजाआड केले. जॉनी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण, हिंगोलीच्या सेनगांव, चिखली, नांदेडच्या भाग्यनगर, लिंबगाव, अमरावतीच्या सिटी कोलवाली पोलीस ठाण्यात तेराहून गुन्ह्यांची गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

सतरा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी गजाआड करणार्‍या प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहाय्यक फौजदार श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार राजाराम काळे, हनुमंत सूर्यंवंशी, मनोहर तावरे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, संतोष मदने, आसिफ मुल्ला, राजविर संधू, प्रविणराज पवार, सतीश जगताप, मोहन वेल्हे, संग्राम गायकवाड, अनिल नागरे, पोलीस अंमलदार अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, सचिन चौधरी, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page