मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२४
मुंबई, – मुलाच्या शाळेची फी भरायची असल्याची बतावणी करुन बोगस सोने देऊन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक करुन पळून गेलेल्या दोन महिलांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. आर्ची योगेश गंगावणे आणि शर्मिला महादेव देठे अशी या दोघींची नावे असून अटकेनंतर या दोघींनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवाशी असलेले संजय चंदनमल जैन हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा जोगेश्वरीतील गांधी स्कूलजवळील गुप्ता निवासमध्ये विपुल ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. ७ जूनला सायंकाळी साडेसात वाजात त्यांच्या दुकानात दोन महिला आल्या. त्यांनी त्यांचे नाव रुचिका संतोष पालव आणि श्रद्धा सुनिल पाटील असल्याचे सांगितले होते. त्यांनी त्यांच्या कानातील झुमके गहाण ठेवायचे आहे. दोन ते तीन दिवसांत पैसे परत करुन झुमके घेऊन जाईन असे सांगितले. सुरुवातीला संजय जैन यांनी नकार दिला. यावेळी या दोघींनी त्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, त्यामुळे त्यांना पैशांची खूप गरज असून दागिने ठेवून पैसे देण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांनी ते झुमके ठेवून दोन्ही महिलांना प्रत्येकी वीस हजार रुपये दिले होते. ११ जूनला त्यांचे बंधू मनोहर जैन हे दुकानात आले होते. यावेळी त्यांनी दोन महिलांना झुमके गहाण ठेवून चाळीस हजार रुपये दिल्याचे सांगितले. त्यांनी ते झुमके पाहिले असता ते बोगस असल्याचे लक्षात आले. या दोन्ही महिलांनी मुलांच्या शाळेची फी भरायची आहे असे सांगून संजय जैन यांच्याकडून चाळीस हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसात दोन्ही महिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. दुकानातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आर्ची गंगावणे आणि शर्मिला देठे या दोन महिलांना रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या दोघींनीच ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर या दोघींनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघींची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत, त्यांनी ते बोगस सोने कोठून आणले, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.