अंबानी कुटुंबियांच्या शाही विवाह सोहळ्यात घुसखोरी
जिओ वर्ल्ड सेंटरमधील घटना; घुसखोरी करणार्या दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२४
मुंबई, – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोळ्यात घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडून दोन संशयितांना तरुणांना ताब्यात घेतले. या दोघांनाही पुढील चौकशीसाठी बीकेसी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. लुकमान मोहम्मद शफी शेख आणि व्यकंटेश नरसैय्या अलुरी अशी या दोघांची नावे आहे. विनापरवाना वांद्रे येथील बीकेसी, जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यातील लुकमान हा कर्नाटक तर व्यकंटेश आंध्रप्रदेशचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी वांद्रे येथील बीकेसीच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळयाला देशभरासह विविध राज्यातील राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार, प्रसिद्ध उद्योगपती, व्यावसायिक आदींची उपस्थिती होती. त्यासाठी मुंबई पोलिसांसह अंबानी कुटुंबियांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. अंबानी यांच्या स्टाफसाठी विशिष्ठ ब्रॅच देण्यात आले असून या ब्रॅचशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी विशेष खबरदारी घेतली होती. तरीही तिथे दोन तरुणांची विनापरवाना घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकाच्या सतर्कमुळे त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला. बलरामसिंग तरमेल लाल हा तरुण पंजाबचा रहिवाशी असून तो सध्या खार परिसरात राहतात. सध्या तो वांद्रे येथील बीकेसी, जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. शनिवारी तो रात्रपाळीवर कामावर हजर झाला होता. रात्री उशिरा अडीच वाजता तो पहिल्या मजल्यावरील मिटींग रुम क्रमांक १०४ मध्ये तपासणीसाठी गेला होता. यावेळी त्याला तिथे एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्याला नंतर ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याचे नाव लुकमान शेख असल्याचे उघडकीस आले. तो कर्नाटकच्या हुबळीचा रहिवाशी असून सध्या विरारच्या बोळीज नाका, जॉयविले अपार्टमेंटमध्ये राहतो. शुक्रवारी रात्री आठ वाजता त्याने जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये विनापरवाना प्रवेश केला होता. त्याला अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम पाहायचा होता. त्यासाठी तो तिथे आला होता, मात्र तिथे संशयास्पद फिरताना त्याला सुरक्षारक्षकांनी पकडून बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेपूर्वी शुक्रवारी व्यकंटेश अलुरी या तरुणाला सुरक्षारक्षकांनी पकडून बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजता आकाश वासुदेव येवसकर हा सुरक्षारक्षक जिओ वर्ल्ड सेंटरच्या पॅव्हेलियन एकच्या बाहेर गस्त घालत होते. यावेळी त्याला एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. या घटनेनंतर आकाशसह इतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे नाव व्यकंटेश अलुरी असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा आंध्रप्रदेशच्या गुंटुर, सनमपुरीचा रहिवाशी होता. अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळा पाहण्यासाठी तो तिथे आला होता. विनापरवाना प्रवेश केल्यामुळे त्याला नंतर बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांना अंबानी कुटुंबियांचा विवाह सोहळा पाहायचा होता. त्यासाठी त्यांनी विनापरवाना घुसण्याचा प्रयत्न केला होता. लुकमान याने विवाह पाहण्यासाठी आपण प्रचंड उत्सुक असल्याचे सांगितले तर व्यकंटेशने तो यूट्यूबर असून त्याला त्याच्या मोबाईलमध्ये हा विवाह सोहळ्याचे शूटींग करुन जास्तीत जास्त प्रसिद्ध मिळवायची होती, त्यासाठी तो तिथे आल्याची कबुली दिली. याप्रकरणी अलरामसिंग लाल आणि आकाश येवसकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लुकमान शेख आणि व्यकंटेश अलुरी यांच्याविरुद्ध ३२९ (३), (४), (२), (१) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.