विम्याच्या साडेनऊ कोटीचा परस्पर अपहार करुन हिताची कंपनीची फसवणुक
गोरेगाव येथील घटना; लॉजिस्टिक कंपनीच्या संचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – विम्याच्या साडेनऊ कोटीचा परस्पर अपहार करुन हिताची कंपनीची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रार अर्जानतर लॉजिस्टिक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकासह तिघांविरुद्ध वनराई पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. करणराज पी साही, प्रमोद जैन आणि स्वाती राजपूत अशी या तिघांची नावे असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
जेम्स फिलिप हे गोरेगाव येथे राहत असून हिताची कंपनीत उपाध्याक्ष म्हणून काम करतात. या कंपनीचे लॉजिकॅश सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत एक करार झाला होता. या करारानुसार या कंपनीला दिलेली कॅश बँकेच्या विविध एटीएम मशिनमध्ये भरणे आणि काढण्याचे काम सोपविण्यात आले होते. मात्र कंपनीने बँकेतून काढलेली ९ कोटी ८४ लाख ७४ हजाराची कॅश बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये जमा केली नाही. या पैशांचा परस्पर अपहार करुन हिताची कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने लॉजिस्टिकच्या संचालकासह इतर वरिष्ठ अधिकार्यांकडे विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे लॉजिस्टिक कंपनीविरुद्ध हैद्राबादच्या सेंट्रल क्राईम ब्रॅचमध्ये तक्रार करण्यात आली होती. १ सप्टेंबर २०२० रोजी पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा सेंट्रल क्राईम ब्रॅचकडून तपास ुसरु केला आहे.
गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालक करणराज साही यांनी कंपनीतील काही पैशांची एका खाजगी बँकेत गुंतवणुक करुन विमा काढला होता. काही दिवसांनी त्यांनी विम्यासाठी अर्ज करताना जेम्स हिताची कंपनीकडून काही कागदपत्रांची मागणी केली होती. क्लेमची रक्कम मिळताच त्यांना त्यांची रक्कम परत केली जाईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे हिताची कंपनीने विमा सल्लागार म्हणून प्रमोद जैन यांची नेमणूक केली होती. त्यासाठी त्याला दरमाह एक लाख रुपयांचे मानधन दिले जात होते. प्रमोद जैनच्या सांगण्यावरुन कंपनीने लॉजिस्टिक कंपनीला क्लेमसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्यानंतर कंपनीकडून विम्याच्या रक्कमेबाबत सतत पाठपुरावा केला जात होता.
३० मार्च २०२३ रोजी हिताची कंपनीला एक मेल आला होता. त्यात बँकेच्या विमा विभागाकडून लॉजिस्टिक कंपनीच्या बँक खात्यात सुमारे साडेनऊ कोटी रुपये ट्रान्स्फर झाल्याचे नमूद करण्यात आले होते. ही रक्कम त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र करणराज, प्रमोद आणि स्वाती राजपूत यांनी संगनमत करुन ही रक्कम परस्पर लाजिस्ट्रिक कंपनीत जमा केली होती. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने जेम्स फिलिप यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर करणराज साही, प्रमोद जैन आणि स्वाती राजपूत या तिघांविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन हिताची कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.