कामावर जाते सांगून तरुणीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या
आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही; एडीआरची पोलिसांकडून नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२४
मुंबई, – कामावर जाते असे सांगून घरातून निघालेल्या एका २३ वर्षांच्या तरुणीने सोमवारी सकाळी मरिनड्राईव्हच्या इंटरकॉन्टीनेटल हॉटेलसमोरील समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. ममता प्रविण कदम असे या तरुणीचे नाव असून तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसले तरी तिने वैयक्तिक कारणावरुन आत्महत्या केल्याचे बोलले जाते. लवकरच तिच्या पालकासह मित्रमैत्रिणींची मरिनड्राईव्ह पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली जाणार आहे. या जबानीतून तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
ममता ही तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहत होती. शहरातील नामांकित आयटी कंपनीत ती कामाला होती. सोमवारी १५ जुलैला सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती कामावर गेली नाही. अंधेरी येथून ती लोकलने चर्चगेट रेल्वे स्थानकात आली. तिथून ती हॉटेल इंटरकॉन्ट्रीनेटलसमोरील समुद्राजवळ आली. काही वेळ तिथे थांबल्यानंतर तिने तिचा पर्स, मोबााईल, लॅपटॉप आणि दागिने काढून समुद्रात उडी घेतली होती. हा प्रकार एका दक्ष नागरिकाच्या लक्षात येताच त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. या माहितीनंतर मरिनड्राईव्ह पोलिसांसह फायर बिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली होती. फायर बिग्रेडच्या जवानांनी तिला पाण्यातून बाहेर काढून तातडीने जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. तिच्या मोबाईलसह इतर कागदपत्रावरुन तिची ओळख पटली होती. त्यानंतर तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या पालकांना देण्यात आली होती. ममताच्या आत्महत्येने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. लवकरच तिच्या पालकासह कार्यालयातील कर्मचारी, मित्र मैत्रिणीची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून तिच्या आत्महत्येमागील करणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.