बिछाना ओला केला म्हणून नऊ वर्षांच्या मुलीला चटके दिले
गोवंडीतील घटना; जन्मदात्या मातेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२४
मुंबई, – झोपेत बिछाना ओला म्हणून नऊ वर्षांच्या मुलीला तिच्या जन्मदात्या मातेने अमानुष मारहाण करुन गरम पळीने गुप्त भागावर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी मातेविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
ही घटना रविवारी १४ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता गोवंडीतील बैंगनवाडी, मोहम्मदीया मशिदीजवळ घडली. ४९ वर्षांचे तक्रारदार गोवंडीतील बैगनवाडी परिसरात राहत असून त्यांचा घड्याळ विक्रीचे दुकान आहे. याच परिसरात शबाना (नावात बदल) ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिचे दोन लग्न झाले आहे. पहिल्या पतीपासून तिला बारा आणि नऊ वर्षांच्या दोन मुली आहेत तर दुसर्या पतीपासून तिला पाच वर्षांचा मुलगा आणि आठ महिन्यांची मुलगी आहे. शबाना क्षुल्लक कारणावरुन तिच्या मुलांना मारहाण करत होती. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन विचारपूस केली असता शबानाच्या रुम मालकीणीने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या नऊ वर्षांच्या मुलीने अंथरुणात लघवी केली होती तिने रागाच्या भरात तिला बेदम मारहाण केली होती. स्वयंपाकासाठी वापरली जाणारी पळी गॅसवर तापवून तिच्या गुप्त भागावर चटके दिले होते. त्यामुळे तिच्या मांडीला आणि पाठीला चटके दिल्याच्या जखमा झाल्या होत्या. चटके दिल्यामुळे ही मुलगी जोरजोरात रडत होती. त्यामुळे तिथे गर्दी झाली होती.
हा प्रकार समजातच त्यांनी शबानाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिने त्यांच्यासह तिथे उपस्थित लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर काही वेळानंतर तिथे शिवाजीनगर पोलिसांची एक टिम आली होती. यावेळी तक्रारदारांनी त्यांनी कॉल केल्याचे सांगून तिथे घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शबानाविरुद्ध ३५२, ११८ (१), ११५ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा होताच शबानाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.