अठरा लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून फसवणुक

मौजमजेसाठी गंडा घालणार्‍या ठगाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२४
मुंबई, – कमी व्याजदरात अठरा लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ४९ वर्षांच्या व्यक्तीची ऑनलाईन फसवणुक करणार्‍या मुख्य आरोपीस भाईंदर येथून बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. राजेश रामकिशोर पांडा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कर्ज देतो सांगून ऑनलाईन फसवणुक करणारी एक टोळी असून या टोळीतील अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. फसवणुकीच्या पैशांसह त्याने त्याच्या सहकार्‍यासोबत मौजमजा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

विकास विजयकुमार जैन हा गोरेगाव येथे राहत असून बेरोजगार आहे. मे २०२४ रोजी त्याने सोशल मिडीयावर कर्जाविषयी एक जाहिरात पाहिली होती. कर्जाची आवश्यकता असल्याने त्याने मॅसेजला रिप्लाय दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला कॅपिटल फायानान्स कंपनीतून समीर राणे बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने त्याच्याकडे कर्जाविषयी विचारणा केली. त्यांच्या कंपनीत कमीत कमी व्याजदरात कर्ज मिळत असल्याने त्याने त्याचा विश्‍वास संपादन कण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विकास जैन याने त्याला अठरा लाखांच्या कर्जाची गरज असल्याचे सांगितले. त्यानेही त्याला लवकरात लवकर कर्ज मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. दोन दिवसांनी त्याला समीरचा मॅनेजर मैनुद्दीन शेख याने संपर्क साधला होता. त्यांच्या कर्जाची प्रोसेसिंग सुरु करण्यात आली असून त्याचा कर्जाचा हप्ता १८ हजार २०० रुपयांचा असेल. त्यासाठी त्याला आधी पहिला हप्ता आधी भरावा लागेल. त्याचबरोबर प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी त्याला पैसे जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जाची प्रोसेसिंग फास्ट होत असल्याने त्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी दिलेल्या बँक खात्यात एक लाख चौदा हजार सहाशे रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम जमा होताच या दोघांनी एका आठवड्यात कर्जाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले.

मात्र एक आठवडा उलटूनही त्याला ही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्याने समीरसह मैनुद्दीनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोघांचे मोबाईल बंद येत होते. त्यांच्याशी त्याचा कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच विकास जैनने बांगुरनगर पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच राजेश पांडा या संशयिताला भाईंदर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या पैशांतून त्याने मौजमजा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कर्जाचे आमिष दाखवून फसवणुक करणारी ही टोळी असल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page