उत्तरप्रदेशचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार धारावीतून गजाआड
वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद; ५० हजार रुपयांचे ईनाम
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – उत्तरप्रदेशच्या मोस्ट वॉण्टेड गुन्हेगाराला धारावी येथून अटक करण्यात युपीच्या स्पेशल टास्क फोर्सला यश आले आहे. तबरेज हाफिज ऊर्फ जहूर असे या गुन्हेगाराचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या आझमगढ, फुलपूरचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेश पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचे ईनाम जाहीर केले होते. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर जहूरला पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेशात नेण्यात आले आहे. जहूर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तरप्रदेशच्या फुलपूर, मुडीयारचा रहिवाशी असलेला जहूरची स्वतची एक टोळी आहे. या टोळीने विविध परिसरातून महागड्या वाहनांची चोरी करुन या वाहनांची बोगस कागदपत्रांच्या मदतीने विक्री केली आहे. वाहन चोरीसह तो लोकल गॅगस्टर म्हणूनही परिचित आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्यासह त्याच्या सहकार्यांना बोलेरो कार चोरी करुन पळून जाताना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत काही महिने कारागृहात राहिल्यानंतर जहूर हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो उत्तरप्रदेशातून पळून गेला होता. गेल्या एक वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याला काही गुन्ह्यांत वॉण्टेड घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचे ईनाम जाहीर केले होते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना जहूर हा काही दिवसांपासून धारावी परिसरात राहत असल्याची माहिती युपीच्या स्पेशल टास्क फोर्सला मिळाली होती. या माहितीनंतर एसटीएफचे एक पथक मुंबईत आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धारावी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
सोमवारी रात्री पावणेबारा वाजता जहूरला या पथकाने धारावी बस डेपोजवळील राजीवनगर परिसरातून अटक केली. चौकशीदरम्यान तोच मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. अटकेनंतर त्याला मंगळवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याला चार दिवसांच्या ट्रॉन्झिंट रिमांडवर ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेशात नेण्यात आले. त्याच्याविरुद्ध आझमगढच्या फुलपूर, आंबेडकनगरच्या टाडा, हंसवर, मालीपूर, बस्तीच्या पुरानी बस्ती, गोरखपूरच्या सिकरीगंज, बेलघाट, संत कबीरनगरच्या धनघटा पोलीस ठाण्यात वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. जहूर हा मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर असून त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेश पोलिसांनी ५० हजार रुपयांचे ईनाम जाहीर केले होते.