वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणी मिहीर शहाला न्यायालयीन कोठडी
मिहीरला विशेष ट्रिटमेंट मिळाल्याचा वरळी पोलिसांवर आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – वरळी हिट ऍण्ड रनच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने पळून गेलेल्या आणि दोन दिवसांनी विरार येथील विरार फाट्याजवळील एका हॉटेलमधून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याला पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी पुन्हा शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने मिहीरची पोलीस कोठडीतून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सायंकाळी त्याला पोलीस बंदोबस्तात कारागृहात पाठविण्यात आले होते. दरम्यान मिहीरला विशेष ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप वरळी पोलिसांवर होत असल्याने या गुन्ह्यांचा तपासाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रविवारी ७ जुलैला वरळी येथे मिहीर चालवत असलेल्या बीएमडबल्यू कारने एका बाईकला जोरात धडक दिली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचे पती प्रदीप लिलाधर नाखवा हे किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर मिहीर हा त्याचा कारचालक राजऋषी बिदावत याच्यासोबत पळून गेला होता. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात मद्यप्राशन करुन हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर तिच्या पतीला दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच मिहीरचे वडिल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश दामजी शहा यांच्यासह त्यांचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर राजेश शहा यांची जामिनावर सुटका करण्यात आली तर राजऋषी बिदावत हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अपघातानंतर मुख्य आरोपी मिहीर हा पहून गेला होता. त्याच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असताना विरारच्या विरार फाटा परिसरातून मंगळवारी मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शिवडीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी दुपारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपीला पळून जाण्यात कोणी मदत केली, त्याने अद्याप गहाळ नंबर प्लेटची माहिती दिली नाही. त्यामुळे त्याची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिल रविंद्र पाटील यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र सरकारी वकिलांच्या मागणीला मिहीरचे वकिल आयुष पासबोला आणि शुदीर भारद्वाज यांनी विरोध केला. पोलीस कोठडीत मिहीरची चौकशी पूर्ण झाली असून त्याच्याकडून सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे आणखीन पोलीस कोठडीची गरज नसल्याने त्यांनी सांगितले. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी एस. पी भोसले यांनी मिहीरला पोलीस कोठडीतून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पालघरचा उपनेता राजेश शहा याचा मुलगा असून त्याच्याकडून पोलिसांनी अपघाताच्या वेळेस घातलेले कपडे, बिअरचे कॅनसह इतर साहित्य जप्त केले आहेत. याच प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी २७ जणांची जबानी नोंदवून घेतली आहे.
दरम्यान मिहीरला वरळी पोलिसांकडून विशेष ट्रिटमेट दिल्याचा आरोप आहे. न्यायालयात आणताना त्याला पोलीस व्हॅनऐवजी काळ्या काचा असलेल्या ईर्टिगा कारमधून आणण्यात आले होते. न्यायालयाच्या आवारात त्याला एका खोलीत नेण्यात आले होते. तिथे सात ते आठजणांनी मिहीरची भेट घेऊन त्याची विचारपूस केली होती. मिहीरला न्यायालयात नेताना पोलिसांच्या कारच्या मागे इतर खाजगी वाहन होते. त्यात मिहीरचे नातेवाईक असल्याचे बोलले जाते. पोलीस कोठडीत मिहीरला विशेष ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीबाबत प्रश्नचिन्हे निर्माण होत आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत वरळी पोलिसांनी तिघांना अटक केली असून राजेश शहा यांची जामिनावर सुटका झाली आहे तर मिहीर त्याचा कारचालक राजऋषी बिदावत हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. लवकरच या दोघांकडून जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे.