मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – खार परिसरातील एका सामाजिक संस्थेच्या खाजगी शाळेत लहान मुलांवर गैरवर्तन झाल्याचा आरोपामुळे शाळेतील शिक्षक आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शाळेच्या तक्रार अर्जावरुन खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत तीन शिपाई महिलांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर या घटनेमागील सत्य बाहेर येईल असे सांगण्यात आले.
खार परिसरात एका सामाजिक संस्थेची खाजगी शाळा आहे. या शाळेत लहान मुलांची देखभाल करण्यासाठी काही महिला केअरटेकर, शिपाई म्हणून कामाला आहे. शाळेत आलेल्या मुलांना त्यांच्या वर्गात नेले, त्यांना खाऊचा डब्बा देणे, त्यांना शौचालयात घेऊन जाणे आदी कामाची या महिलांवर होती. काही दिवसांपूर्वी या महिलांकडून काही शाळेच्या मुलाशी गैरवर्तन होत असल्याची माहिती एका मुलाने त्याच्या पालकांना समजली होती. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. या महिला लहान मुलांच्या शरीराला नकोसा स्पर्श करत असल्याने या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याधापकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची मुख्याधापकांनी गंभीर दखल घेत त्याची चौकशी सुरु केली होती. ही चौकशी सुरु असताना शाळेच्या वतीने खार पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तीन शिपाई महिलांवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या तिन्ही महिलांची पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही चौकशी सुरु असल्याने अद्याप कोणावर अटकेची कारवाई झाली नाही. मुलांच्या तक्रारीत किती तथ्य आहे याची शहानिशा सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या तिन्ही महिलांनी त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले आहे. त्यांनी कुठल्याही लहान मुलांसोबत गैरवर्तन केले नाही असे शाळेच्या चौकशी समितीकडे सांगितले आहे. एकूण गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.