सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने ६६ लाखांची कॅश पळविली
पळून गेलेल्या मुख्य आरोपीस पुण्यातून अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – शुद्ध सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने कर्नाटकमधील एका व्यापार्याकडील ६६ लाख ७९ हजाराची कॅश घेऊन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस पुण्यातून एल. टी मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. ऍश्वर्ड विल्सन असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून लवकरच फसवणुकीची सर्व कॅश हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आर प्रदीपकुमार हे मूळचे कर्नाटकचे रहिवाशी असून त्यांचा सोन्याचा दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना त्यांच्या मित्राने ऍश्वर्डविषयी माहिती दिली होती. तो झव्हेरी बाजार येथील मोठमोठ्या बुलियन कंपन्यासाठी एजंट म्हणून काम करतो. त्याच्याकडे सव्वाकिलो शुद्ध सोन्याचे प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाचे बारा बिस्कीट आहेत, तो त्याला स्वस्तात ते बिस्कीट देईल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी ऍश्वर्डला फोन केला होता. यावेळी त्यांच्या टॅक्सविना शुद्ध सोन्याचे बिस्कीट खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. १ किलो २०० ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्यासाठी त्याने त्यांना ६७ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. ठरल्याप्रमाणे आर प्रदीपकुमार जानेवारी महिन्यांत मुंबईत आले होते. मुंबादेवी मंदिराजवळ त्यांची ऍश्वर्डशी भेट झाली. तिथे त्याने त्यांना शंभर ग्रम वजनाचे शुद्ध सोन्याचे एक सॅम्पल दाखविले होते. ते बिस्कीट खरे होते. त्यामुळे त्यांनी बाराशे ग्रॅम वजनाचे प्रत्येकी बारा सोन्याचे बिस्कीट देण्याचे मान्य करुन त्यांच्याकडून कॅश स्वरुपात ६६ लाख ७९ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तो त्यांना घेऊन एका शेठच्या कार्यालयाबाहेर आला. पैसे घेऊन ऍश्वर्ड सोन्याचे बिस्कीट घेऊन येतो सांगून निघून गेला आणि परत आला नाही. त्याला कॉल केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. ऍश्वर्ड हा पळून गेल्याने त्यांनी एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ऍश्वर्डविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना ऍश्वर्ड विल्सन हा पुण्यात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने पुण्यातून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.